लातूर - लक्षवेधी औसा मतदारसंघात अखेर भाजपचे उमेदवार अभिमन्यू पवार हे विजयी झाले आहेत. गेल्या दोन टर्मपासून आमदार म्हणून राहिलेले काँग्रेसचे बसवराज पाटील यांचा त्यांनी २७ हजार मताधिक्यानी पराभव केला आहे. अंतर्गत विरोध आणि प्रस्थापितांना लढा देत त्यांनी विजय मिळविला असून आता अभिमन्यू चक्रव्यूहातुन बाहेर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली आहे.
राज्याचे लक्ष औसा विधानसभा मतदारसंघाकडे लागले होते. कारण याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवाय भाजपमधून त्यांना अंतर्गत विरोधी केला जात होता. मात्र, जनतेचे आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांनी केलेले परिश्रम हे कामी आले आहेत. निवडणूक लढविण्यापूर्वीही जनतेची अनेक कामे केली आहेत. आता जबाबदारी अजून वाढली असून सदैव जनतेची सेवा करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या दोन टर्मपासून याठिकाणी काँग्रेसचे बसवराज पाटील यांचे वर्चस्व होते. शिवाय भाजपतून बंडखोरी करून बजरंग जाधव हे अपक्ष म्हणून रिंगणात होते. असे असताना २७ हजार मताधिक्याने अभिमन्यू पवार यांचा विजय झाला आहे. जनतेने ही निवडणूक हाती घेतली होती. मतदारसंघाचा विकास कोण करणार हे जनतेला माहिती होते. त्यामुळेच हा विजय शक्य झाला आहे. जनतेच्या अपेक्षा आणि जबाबदारीचे भान असून विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
अंतर्गत मतभेदला अधिकचे लक्ष न देता विकास आणि जनतेचे प्रश्न जाणून घेण्यावर अधिकचा भर दिला होता. यामुळेच या मतदारसंघात चित्र बदलेले असल्याचे त्यांनी सांगितले. औसा हा परंपरागत शिवसेनेचा मतदारसंघ होता. यावेळी मात्र, भाजप जागा सोडण्यात आली आणि भाजपाचे अभिमन्यू पवार यांनी या ठिकाणी विजय खेचून आणला आहे.
हेही वाचा - लातूरच्या जनतेचा सम समान न्याय; प्रमुख पक्षांच्या दोन-दोन उमेदवारांना नेतृत्वाची संधी
हेही वाचा - लातूरकरांच्या प्रेमापुढे विरोधकही थंडावले - अमित देशमुख