लातूर - दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता अधिक वाढत आहे. याचा मोठा फटका मनुष्यासह मुक्या जनावरांनाही बसत आहे. पाण्याविना पशुपक्ष्यांना जीवाला मुकावे लागत असल्याचे चित्र देवणी तालुक्यातील बोरोळ येथे पाहवयास मिळाले आहे. वाढत्या उन्हामुळे आणि पिण्यास पाणी नसल्याने येथील नाथ मंदिराच्या आवारात 20 ते 25 कावळे मृतावस्थेत आढळून आले.
जिल्ह्यात मे महिन्याच्या अखेरीस दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होत असताना गेल्या 4 दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. अनेक ठिकाणी 3 वेळचे जनावरांचे पाणी 1 वेळेवर आले आहे. पक्ष्यांना तर पाण्याविना जीव गमवावा लागत आहे. देवणी तालुक्यातील बोरोळ गावातील नाथ मंदिर परिसरातल्या झाडाच्या सावलीत अनेक पक्षी विसावतात. बुधवारी उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत्या, शिवाय पिण्यासाठी पाणीही उपलब्ध नसल्याने अनेक कावळे मृतावस्थेत आढळून आले.
जागोजागी कावळे मृतावस्थेत पडले असून वन विभागाकडूनही कोणत्याही प्रकारच्या पानवाट्याची सोय करण्यात आलेली नाही. दोन दिवसांपूर्वीच एका जनावराचाही पाण्याविना मृत्यू झाल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. यावरून पाण्याची स्थिती आणि प्रशासनाकडून होत असलेली अंमलबजावणीचे उदाहरण समोर येत आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.