लातूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले उमेदवार म्हणून अभिमन्यू पवार यांची मोठी चर्चा राज्यभर होत आहे. आज सायंकाळी 5 वाजता त्याच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा औसा तालुक्यातील किल्लारी येथे होत आहे. त्याअनुषंगाने जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराबरोबरच पक्षातील अंतर्गत मतभेद दूर करण्याचे आव्हानही पक्षश्रेष्ठींसमोर असणार आहे.
किल्लारी येथील पोलीस स्टेशनच्या समोरील मैदानात ही सभा सायंकाळी 5 च्या दरम्यान होणार आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवारांच्या दृष्टीने ही सभा महत्वाची असून अमित शहा काय बोलणार हे देखील महत्वाचे आहे. जिल्ह्यात उमेदवारी जाहीर होताच भाजपात गट बाजीला सुरुवात झाली होती. उमेदवारी माघार घेण्याच्या दिवशी बंडखोरांना थंड करण्यात पक्षाला काहीप्रमाणात यश आले असले तरी अद्यापही अंतर्गत मतभेद कायम आहेत. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे अभिमन्यू पवार यांना उमेदवारी दिल्याने नाराज आहेत.
भाजपचे बंडखोर बजरंग जाधव यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. उदागिरमध्ये विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांना तिकीट डावलण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी उमेदवारी माघारी घेतली असली तरी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. अहमदपूर मतदारसंघात देखील नाराजीचा सूर कायम आहे. शिवाय लातूर ग्रामीणमध्ये भाजपची ही जागा सेनेला सोडल्याने रमेश कराड गटात नाराजी आहे. त्यामुळे आजच्या सभेत उमेदवारांचा प्रचार तर होईलच मात्र, पक्षातीलच नेत्यांची नाराजी कशी दूर केली जाणार हे देखील पाहावे लागणार आहे. या सभेला गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती लाभणार असल्याचे सांगण्यात आले आहे.