लातूर - जिल्ह्यात सद्यस्थितीला एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही, हीच परिस्थती कायम ठेवण्यासाठी तुम्ही गाव सुरक्षित ठेवा, तुमच्या मदतीसाठी कायम सजग असल्याचे आश्वासन पालकमंत्री अमित देशमुख यांनी पदाधिकारी, सरपंच तसेच गावतल्या तरुणांना दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या अनुषंगाने त्यांनी जिल्ह्यातील सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी टेलीकॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
सध्या लातूर जिल्हा कोरोनामुक्त असला तरी अद्याप लढाई संपलेली नाही. लॉकडाऊनच्या संदर्भाने नियमात बदल होत राहतील, परंतु, कोरोनावर लस किंवा प्रभावी उपचार पध्दतीचा शोध लागणार नाही तोपर्यंत कमी अधिक प्रमाणात आपणाला लढा सुरूच ठेवावा लागणार आहे, असे अमित देशमुख म्हणाले. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील स्थिती काय आहे, ग्रामस्थांच्या अडचणी काय आहेत याचा आढावा घेतला.
कोरोनामुक्त कायम राहायचे असेल तर परराज्यातील किंवा परजिल्हयातील कोरोनाबाधित रुग्ण आपल्या जिल्ह्यात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल. ही बाब लक्षात घेऊन जिल्हयाच्या सीमा कडेकोट बंद करण्यात आल्या आहेत. त्या कायम ठेवण्याच्या अनुषंगाने तरुणांनी लक्ष केंद्रीत करावे. अत्यावश्यक असेल तरच प्रवेश द्यावा, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी दिल्या आहेत.
टेलीकॉन्फन्सिंगमध्ये लक्ष्मीबाई वाघमारे, सुभाष जाधव, प्रकाश ऊफाडे, बबन ढगे, सज्जन लोनाळे, गणेश ढगे, गोपिनाथ खताळ, दादाराव पवार, अनिल पाटील यांच्यासह अनेकांनी गावातील व परिसरातील समस्या मांडल्या त्या सर्व समस्या सोडविण्याचे पालकमंत्री देशमुख यांनी आश्वासन दिले.