लातूर - राज्यातील इतर परिक्षांबद्दल निर्णय होत असले, तरी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात अद्यापही संभ्रम आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन ही अनिश्चितता दूर करावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना दिले आहेत.
नाशिक येथील आरोग्यविज्ञान विद्यापीठामार्फत राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येतात. यामध्ये मेडिकल, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी त्याचप्रमाणे नर्सिंग परीक्षांचा समावेश आहे. मात्र, सध्याच्या टाळेबंदीच्या परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पालकांना आरोग्य विज्ञान विद्यापीठ काय निर्णय घेणार, याबाबत चिंता वाटत आहे.
विद्यापीठाने स्पष्ट भूमिका घेऊन याबाबतची अनिश्चितता तातडीने दूर करावी, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचा निर्णय राष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या केंद्रीय परिषदांवर अवलंबून असतो. असे असले तरीही या संस्थांशी तातडीने विचारविनिमय करून परीक्षांबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या संकटात डॉक्टरांचे मनुष्यबळ कमी पडत आहे. हे लक्षात घेता राज्य सरकारने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे.