लातूर - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठातील कामात घोटाळा आणि चारचाकी गाडीच्या फॅन्सी नंबरसाठी हजारो रुपये मोजले असल्याचे आरोप सिनेट सदस्य तथा युवा सेनेचे प्रा. सुरज दामरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
हेही वाचा - डॉन ब्रॅडमन यांच्या 'त्या' कॅपचा लिलाव..मिळाली 'इतकी' किंमत
स्वराती विद्यापीठाचे उपकेंद्र लातूर येथे आहे. शिवाय या विद्यापीठात मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. यामध्ये साहित्य खरेदीपासून ते कुलगुरू यांच्या गाडीपर्यंत कसा पैसा खर्ची केला जात आहे याचा लेखाजोखा प्रा. सुरज दामरे यांनी मांडला. मध्यंतरी कोविड लॅबच्या उभारणीत आणि साहित्य खरेदीसाठी १ कोटी ७ लाख ८५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. याकरिता निविदा काढून त्याचे प्रसिद्ध करून काम करणे आवश्यक होते. मात्र, नियमांची अंमलबजावणी न करता सलगीच्या कंत्रादाराला याचे काम देण्यात आले होते. पीपीई किट आणि मस्कच्या दरही मनमानी करण्यात आले होते.
दुसरीकडे महागड्या गाड्यांची मोठी चर्चा रंगत आहे. चारचाकी गाडीच्या व्हीआयपी नंबरसाठी कुलगुरू यांनी चक्क ५० हजार रुपये मोजले आहेत. एवढे असताना दुसरी आलिशान गाडी कुलगुरू यांनी खरेदी केली आहे. दरम्यानच्या काळात विद्यापीठ परिसरात एक बंधारा उभारण्यात आला होता. याकरिता १२ लाख रुपये अंदाजित रक्कम ठरविण्यात आली होती. पण निविदा न काढता हे काम केवळ ६ लाख ५४ हजारात पूर्ण केल्याचा प्रताप कुलगुरू यांनी केल्याचा आरोप प्रा. दामरे यांनी केला आहे. शिवाय या कामाचे एम. बी रेकॉर्डही उपलब्ध नाही.
या सर्व अनियमित कारभाराबद्दल विचारण्यात आलेले प्रश्न मिळालेली उत्तरे दामरे यांनी माध्यमांसमोर ठेवली होती. शिवाय या सर्व बाबींची चौकशी करून कारवाई न झाल्यास उपकेंद्रसमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.