लातूर - शहरातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज महाविद्यालयातील प्राचार्य आणि कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. विद्यापीठाचे कुलगुरूंसमोरच आपले गाऱ्हाणे माडणार असल्याचा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतल्याने सकाळी १० वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी ३ पर्यंत सुरू होते.
शहरालगतच कृषी महाविद्यालय असून आज सकाळपासून चौथ्या वर्षात असलेले विद्यार्थी वेगळ्या पवित्र्यात होते. वसतिगृहात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असल्याने राहण्यापासून सर्वच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महाविद्यालयात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट असून प्राचार्य आणि प्राध्यापक यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. मात्र, आपण समोर येऊन गऱ्हाणे मांडले तर आपल्याला टार्गेट केले जाईल. त्यामुळे सर्व काही कुलगुरू यांच्यासमोरच बोलणार असल्याचे त्यांचे म्हणणे होते. दुसरीकडे येथील विद्यार्थ्यांनची कुठल्याही प्रकारची गौरसोय होत नाही. पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय असल्याचे प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे यांनी सांगितले. काम हे काही बळजबरीने नाही कृषी महाविद्यालयातील प्रात्यक्षिकेचा भाग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जर लेखी मागण्या मांडल्या तर त्याची सोडवणूक करता येईल. मात्र, विद्यार्थ्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता आंदोलनाला सुरवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता कुलगुरूआल्यावरच आता तिढा सुटणार की विद्यार्थी प्राचार्य यांच्याशी काय संवाद साधणार हे पाहावे लागणार आहे.