लातूर - युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सध्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राज्यभर दौरा करत आहेत. आज लातूरमधील युवा संवादाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांना विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले. मात्र, एका पठ्याने तर मुख्यमंत्री कसे होता येईल, याचा फॉर्म्युलाच त्यांच्यासमोर मांडला. यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि ठाकरे यांनीही या विषयाचा बाऊ होणार नाही, याची काळजी घेत निवडणुकांना अजून वेळ असल्याचे सांगत वेळ निभावून नेली.
सोलापूर येथून आदित्य ठाकरे यांच्या युवा संवादाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. आज दुपारी लातूर येथील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. जे कर्नाटकात झाले तसेच, महाराष्ट्रात घडवून तुम्हाला भाजपने पाठिंबा द्यावा आणि तुम्ही मुख्यमंत्री कसे होणार याचे गणित विद्यार्थ्याने त्यांच्यासमोर मांडले. यावर ठाकरे यांनी त्वरित व्यक्त न होता वेळ घेऊन अद्यापही निवडणुकांना अवकाश असून सध्या महाराष्ट्रात भगवा कसा फडकेल, यावर काम करीत असल्याचे सांगितले. युवा संवादाबरोबरच पक्ष संघटन आणि शिवसेना पक्षाचे उपक्रम तरुणांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ज्या हेतूने ठाकरे तरुणांशी संवाद साधत आहेत. त्याला पोषक असणारा 'लातूर पॅटर्न' विद्यार्थ्याने सांगितला आणि त्याचीच चर्चा रंगू लागली.
युवा संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ठाकरे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. गावच्या प्रश्नापासून ते देशाच्या सुरक्षेबद्दल मुद्दे उपस्थित केले. यावेळी दयानंद महाविद्यालयाचे सभागृहात तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.