लातूर - कोणी देईल ते खायचं, अन्यथा पोटात पाय घेऊन आडोसा असलेल्या जागेत झोपायचं; अशी अवस्था आहे लातूर शहरात बेघर असलेल्या 40 ते 50 नागरिकांची. एकीकडे देश महासत्तेच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे अनेकांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसाठी नागरिक झगडत आहेत. त्यात लालफितीची दिरंगाई आणखीच भर टाकत असल्याचा चित्र काय नवीन नाही. अशीच परिस्थिती लातूर जिल्ह्यात समोर आली आहे. बेघर असणाऱ्या नागरिकांना निवारा मिळावा म्हणून तीन वर्षांपूर्वी सादर केलेला प्रस्ताव आजही धूळखात पडलेला आहे. त्यामुळे बेघर असलेले हे भारतीय नागरिक सध्या पावसात कशा पद्धतीने जीवन जगतात यासंबंधी 'ईटीव्ही भारत' ने घेतलेला हा आढावा...
शहरातील बेघर असलेल्या अशा भिक्षूकांना तीन वर्षांपूर्वी निवारा देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव दाखल झाला होता, एवढेच नाहीतर जागाही ठरविण्यात आली. मात्र, तीन वर्षानंतर ना यावर काही विचार झाला आहे ना प्रस्तवाला मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे शहराचे भूषण असलेल्या गंजगोलाई, सुभाष चौक, बसस्थानक या परिसरात हे बेघर नागरिक आसरा घेताना पाहावयास मिळत आहेत. पोटाची खळगी तर भरली जातील पण रात्रीचा निवारा मिळत नसल्याने पावसाळा, हिवाळा या नागरिकांना आडोसा मिळेल त्या जागेत रात्र काढावी लागत आहे.
मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात न्यू लाईफ या सामाजिक संस्थेने नावाला साजेल असे काम केले आहे. लॉकडाऊनमुळे या रस्त्यावर फिरणाऱ्यांचे जगणेही मुश्किल झाले होते. त्यावेळी संस्थेचे आकाश गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन दोन वेळच्या जेवणाची सोय केली होती. मात्र, सध्या समस्या या कायम आहेत. शहरातील गांधी मार्केट येथे निवारासाठी जागाही देण्याचे ठरले आहे. या ठिकाणी वृद्ध, मनोरुग्ण, बालक, महिला अशा 100 नागरिकांचा विचार करून घरे बांधण्यात येणार आहेत. याकरिता 2 कोटी 32 लाखांचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही याला परवानगी मिळालेली नाही. मनोरुग्ण भिक्षुकाचे जीवन जगत असताना घरांच्या मागणीसाठी कोण शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवणार? मात्र, सरकारला या बद्दल मायेचा पाझर फुटवा आणि लवकरात लवकर यांना निवारा मिळावा हीच अपेक्षा सामाजिक संस्थाकडून व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात उदगीर शहर वगळता कुठेही अशा बेघर असणाऱ्या नागरिकांसाठी निवारा अथवा घरे उपलब्ध नाहीत. लातूर तर जिल्ह्याचे ठिकाण आहे. मात्र, राजकीय नेत्यांची उदासीनता आणि प्रशासकीय कामातील दिरंगाई यामुळे कुणी घर देत का घर असेच म्हणण्याची नामुष्की या नागरिकांवर आली आहे.