निलंगा (लातूर) - निलंगा तालुक्यातील धानोरा येथील तेरणा नदी पात्रावर असलेल्या धरणात बालाजी आप्पाराव बोधले (वय ४०, रा. ननंद ता. निलंगा) या मजूराने आत्महत्या केली. हाताला काम मिळत नसल्याने आपले जीवन संपविल्याची चर्चा आहे.
सध्या कोरोनामुळे अनेक कामे ठप्प झाली आहेत त्यातच मोठा पाऊस झाला आणि सोयाबीन काढणीचा हंगामही गेला. हा मजूर आणि त्याची पत्नी मोलमजुरी करून जगत होते. त्यातच ओला दुष्काळ पडला. याच निराशापोटी त्याने घर सोडल्याचे सांगितले जात आहे. गेल्या चार दिवसापांसून तो गायब होता.
या मजुराचा भाऊ अनिल बोधले यांनी बालाजी बोधले बेपत्ता झाल्याची तक्रार किल्लारी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान, बुधवारी (ता. २३) एक मृतदेह सायंकाळी सात वाजता पाण्यावर सडलेल्या अवस्थेत तरंगत असल्याचे दिसले आणि एकच खळबळ उडाली. प्रेत पूर्णत: सडले असल्याने ओळख लागत नव्हती. शेवटी मयताचा भाऊ अनिल यांनी बालाजी यांच्या कपड्यांवरून त्यांना ओळखले.
हेही वाचा - रुग्णांऐवजी चक्क डॉक्टरांनाच नेले स्ट्रेचरवरुन; कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक!
याबाबत कासार शिरसी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढला. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. हा मृतदेह निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास बिट जमादार घोणे हे करत आहेत.
हेही वाचा - 'अनलॉक'मध्येही लातूरचे अर्थचक्र लॉकच; क्लासेसमधून होणारी कोट्यवधींची उलाढाल ठप्प