लातुर - लग्नसमारंभात जेवण केल्याने तब्बल ८० नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना उदगीर तालुक्यातील तोंडारी गावात घडली आहे. मात्र, प्राथिमक उपचार केंद्रात दाखल झालेल्या रुग्णांना झालेली विषबाधा जेवणातून झाली की अन्य कारणामुळे या बाबत आरोग्य विभागही संभ्रामात आहे.
तोंडार येथे एक लग्न समारंभ होता. या लग्नसमारंभात जेवणाच्या अनेक पंगती बसल्या होत्या. त्यानंतर लग्नसमारंभ पार पाडून वऱ्हाडी मंडळी नववधूला घेऊन मार्गस्थ झाले. मात्र, लग्नस्थळी जेवणकरून गेलेल्या काही नागरिकांना पोटदुखी, उलट्या आणि मळमळ होण्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्या ग्रामस्थांनी तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र जवळ केले. दिवसभरात शासकीय रुग्णालयात ६० व खासगी दवाखान्यात २० जणांनी उपचार घेतले होते.
लग्नातील जेवणातूनच ग्रामस्थांचे आरोग्य बिघडले असल्याचा अंदाज लावून आरोग्य विभागाचे कर्मचारी लग्नघरी दाखल झाले. मात्र, तेथील जेवणाचे सर्व पदार्थ संपले होते. तसेच या लग्नात पिण्यासाठी पाण्याच्या जारचा वापर करण्यात आला होता. मात्र, ग्रामस्थांना नेमकी कोणत्या कारणामुळे विषबाधा झाली, याचे कारण अद्याप समजले नाही.
विषबाधा झालेल्या रुग्णांना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले असून रुग्णामध्ये वयोवृद्ध नागरिक तसेच लहान मुलांचाही समावेश होता. आरोग्य अधिकारी डॉ. टिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर उपचार करण्यात आले.