लातूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात तिसरा लॉकडाऊन सुरु आहे. या तिसऱ्या टप्प्यात काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यात अडकून पडलेल्या 13 हजार 590 परप्रांतीय नागरिकांचा प्रश्न मार्ग लागला आहे. आतापर्यंत 7 हजार 600 मजुरांसह विद्यार्थी, यात्रेकरू यांचे स्थलांतर झालेले आहे. त्यामुळे मजुरांना दिलासा मिळाला आहे.
मजुरांसाठी प्रशासनाने विशेष सोय केली असून, त्यांना मोफत प्रवास शिवाय राज्याच्या सीमेपर्यंत सोडले जात आहे. आतापर्यंत मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या राज्यातील मजुरांना सोडण्यात आलेले आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात 13 हजार 590 नागरिक अडकून पडले होते. यामध्ये काही यात्रेकरू आणि शालेय विद्यार्थी यांचाही समावेश होता.
तिसरा लॉकडाऊन अंतिम टप्प्यात असताना या मजुरांचा स्थलांतराचा प्रश्न मार्गी लागत आहे. जिल्ह्यातील लातूर, औसा येथील बसस्थानकातून हे मजूर मार्गस्थ झाले आहेत. अधिकतर मजूर हे उत्तरप्रदेश येथील असून, त्यांच्या सीमेपर्यंत बसच्या माध्यमातून सोडले जात आहे. शिवाय इतर जिल्ह्यातील नागरिक हे खासगी वाहन करूनही मार्गस्थ होत आहेत. याकरिता आरोग्य तपासणी संबंधित जिल्हा प्रशासनाची परवानगी गरजेची आहे. त्यानुसार केवळ 5 हजार 613 मजूर, विद्यार्थी व इतर नागरिक जिल्ह्यात अडकून आहेत. त्यांनाही लवकरच त्यांच्या मूळगावी सोडले जाणार आहे. एकंदरीत मजुरांच्या स्थलांतरासाठी 1 मे पासून प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे अधिकच्या मजुरांना मूळ गावी जाणे शक्य झाल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात सर्व व्यवहार सुरळीत होत असतानाच अडकून पडलेल्या मजुरांचाही प्रश्न मार्गी लागत आहे. शिवाय उदगीर येथील रुग्णांची संख्या आटोक्यात येऊन जिल्हा ग्रीन झोनमध्ये आणण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.