लातूर - सोलापूर येथून विदर्भात गुटखा घेऊन जाणारा टेम्पो उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांच्या पथकाने शुक्रवारी पकडला. हा गुटखा २४ लाख १२ हजाराचा असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुटखा आयशर टेम्पोतून (क्रमांक एम.एच.१३ सी.यू. ०८६९) सोलापूरहून नांदेडकडे नेत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार संबंधित टेम्पो शुक्रवारी चापोली (ता. चाकूर) जवळ आला असता उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे यांनी कारवाई करत तो शुक्रवारी (ता.१०) रात्रीच्या सुमारास चाकूर पोलिसांच्या ताब्यात दिला.
या टेम्पोत ३० पोते गुटका आढळून आला. याची अंदाजे किंमत २ लाख ५२ हजार रुपये आहे, तर टेम्पोची किंमत ७ लाख रुपये असा एकूण साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. टेम्पो चालक अशोक अभिमन्यू मोरे व मदतनीस अविनाश भगवान वाघमारे यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, यावर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.