लातूर - येथील निलंगा तालुक्यातील मसलगा येथून लातूरकडे निघालेल्या तीन तरुणांचा लातूर-जहिराबाद रस्त्यावर अपघात झाला. समोरून येणाऱ्या भरधाव टिपरने त्यांना चिरडले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
हेही वाचा - ऐन हिवाळ्यात मुंबईत पाऊस; अरबी समुद्रात घोंगावणार पवन आणि अम्फन चक्रीवादळे
मसलगा येथील हरी शिवाजी शिंदे (वय २५), चंद्रकांत दगडू शिंदे (वय २०), आकाश विठ्ठल शिंदे (वय २७) हे तिघे गावाकडे येत होते.दरम्यान, गौर आणि मसलगा या गावाच्यामध्ये महामार्गाचे काम चालू असल्याने सर्व रस्त्याचे खोदकाम केल्याने त्यांना टिप्पर दिसला नाही. भरधाव येणाऱ्या टिप्परने (क्रमांक एम.एच ०४ बी.सी.४३१३) त्यांच्या मोटारसायकलला (एम एच २४ बी ऐ १५४२) जोराची धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. गंभीर जखमीला पान चिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.