कोल्हापूर - काही तरी पदरात पडतेय म्हणून केंद्राचे आरक्षण घ्या. असे सांगितले जात आहे. असे सांगणाऱ्यांनी इडब्लूएस(आर्थिदृष्ट्या मागास) आरक्षणामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही, असे लेखी देण्याचे आवाहन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले. आज सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षण संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथे बोलत होते.
यावर्षी काही लोक तात्पुरते इडब्लूएस आरक्षण मागत आहेत. मात्र, पुढच्या वर्षीची जबादारी कोण घेणार? असा प्रश्न संभाजीराज्यांनी उपस्थित केला. इडब्लूएस आरक्षण नको ही केवळ माझीच नाही तर सकल मराठा समाजाची भूमिका आहे. मराठा आरक्षणाला विरोध करायचा असेल तर, केवळ मला विरोध करू नका. विरोध करायचा असेल तर सकल मराठा समाजाला करुन दाखवा, असे जाहीर आवाहन संभाजीराजे यांनी केले.
मराठा समाज लढवय्या आहे. आत्महत्या करणे हा पर्याय आहे. समाजाच्या हितासाठी लढण्यास आम्ही सज्ज आहोत. समाजाचा आवाज न्यायालयापर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. ज्या 42 तरुणांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले ते व्यर्थ जाऊ देणार नाही, असे संभाजीराजे म्हणाले.
आज कोल्हापुरात सकल मराठा समाजाकडून मराठा संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराज्यांनी ही यात्रा काढू नये, असे आवाहन केल्यानानंतर ही यात्रा रद्द करण्यात आली. यावेळी खासदार संभाजीराजे, आमदार प्रकाश अबीटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यापूर्वी मौनी महाराज यांच्या समाधी मठात जाऊन त्यांनी दर्शन घेतले.