कोल्हापूर- बहादूर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानमध्ये ६० तास घालवल्यानंतर ते आपल्या देशात परतले. भारतात परत आल्यावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सोशल मीडियावर त्यांच्या मिशांची सध्या खूप चर्चा आहे. शिवाय #WelcomeHomeAbhinandan ट्रेंडसुद्धा सुरू झाला आहे.
त्याचबरोबर अजून एका गोष्टीचा ट्रेंड सुरू आहे, तो म्हणजे अभिनंदन यांच्या मिशीचा. त्यांच्या मिशीचे अनेक जण चाहते झाले आहेत. कोल्हापुरातील तर एका सलूनमध्ये चक्क अभिनंदन स्टाइल मिशी बनवायची असेल तर एकदम मोफत, असा उपक्रमच सुरू केला आहे. चला तर पाहुयात काय आहे नेमका हा उपक्रम...
मिश्या असाव्यात तर अभिनंदन यांच्या सारख्या, नाहीतर मिशाच नसाव्यात, असे म्हणत अनेक तरुण त्यांच्या सारख्या मिशा बनवून घ्यायला हेअर अफेअर सलूनमध्ये गर्दी करत आहेत. कोल्हापुरातील राजारामपुरीमध्ये 'हेअर अफेअर' नावाचे सलून आहे. अनेकजण अभिनंदनसारख्या मिशा ठेऊन तशा पोस्ट अपलोड करत आहेत.
कोल्हापुरातील तरुणही यामध्ये मागे राहिले नाहीत. विशेष म्हणजे सलून मालकाने अभिनंदन यांच्या स्टाईलने मिशी ठेवायची असेल, तर हेअर स्टाईल सुद्धा फ्रीमध्ये करणार असल्याचा बोर्ड दुकानाबाहेर लावला आहे. त्यामुळे सकाळपासूनच सलूनमध्ये अभिनंदन स्टाईल मिशी बनवून घेण्यासाठी तरुण गर्दी करत आहेत.
ज्या बहादुरी आणि धाडसाने विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानी आर्मीच्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, त्याचवेळी भारतातील जनतेला हे समजले होते की, हा पायलट खूपच हुशार आहे. कठीण काळातही ज्याप्रकारे अभिनंदन यांनी विनम्रतेने त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली ती खरंच खूप काही शिकवून जाणारी आहेत. त्यामुळेच ते संपूर्ण भारतीयांच्या मनात घर करून गेले आहेत. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला त्यांच्याविषयी अभिमान आहे.