कोल्हापूर - जिल्ह्यात आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. आज सकाळी एका रुग्णाच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शाहूवाडी तालुक्यातील उचत इथल्या 30 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित तरुण दिल्लीताल तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता, असेही स्पष्ट झाले आहे. या तरुणाच्या संपर्कात आलेल्या इतर काहींची सुद्धा माहिती घेऊन तपासणी केली जाणार आहे.
कोल्हापूरात यापूर्वी भक्तीपूजानगर मध्ये बहीण भावाला, बावड्यातील 63 वर्षीय वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली होती. शिवाय कोल्हापूरातीलच वडगावमधल्या एका तरुणीला कोरोनाची लागण झाली होती. तिला मिरज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या तरुणीचे 14 दिवसांनंतरचे दोन्ही अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर शहरातील भक्तीपूजा नगर मधील 'त्या' भावाचा सुद्धा 14 दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत 5 जणांना कोरोनाची लागण झाली असली तरी त्यातील दोघे आता कोरोनामुक्त झाले आहेत. तर आजच्या शाहूवाडीतील या नवीन रुग्णामुळे बाधितांची संख्या पुन्हा 3 वर गेली आहे.
★कोल्हापूरातील 56 जण गेले होते दिल्लीतील तबलीगी जमातीच्या मेळाव्याला -
कोल्हापूर जिल्ह्यातून 56 जण दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलीगी जमातच्या मेळाव्यात गेले होते. त्यापैकी कोल्हापूरात परतलेल्या 10 जणांना 1 एप्रिल रोजी पोलिसांनी शोधून काढले होते. त्यानंतर लगेचच शाहुवाडीतील आणखी 16 जणांचा प्रशासनाने शोध घेतला होता. त्या सर्वांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यातीलच उचत गावातील 30 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे आज उघड झाले आहे. तबलिगी मेळाव्याला गेलेल्या 56 जणांपैकी 26 जण कोल्हापूरात परत आले असून उर्वरित सर्वांना दिल्ली आणि इतर राज्यात इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे.
★असा होता या तरुणाचा दिल्ली ते शाहूवाडी प्रवास-
हा तरुण दिल्ली येथून 14 मार्च रोजी निघून 16 मार्चला कोल्हापुरात पोहोचला होता. येथील धार्मिक स्थळामध्ये एक दिवस राहून तो मलकापूरला खासगी वाहनातून गेला होता. मलकापूरमधील धार्मिक स्थळातही तो एक दिवस राहिला. यानंतर तो 18 मार्चला आपल्या घरी परतला होता. या तरुणाला पन्हाळा येथील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ५ एप्रिलला प्रशासनामार्फत दाखल करण्यात आले होते. मरकजहून परतलेल्या अन्य प्रवाशांसोबतच याचा स्वाब घेण्यात आला होता. त्यात त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. त्याला आज सीपीआरमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याला कोल्हापुरातून मलकापूरला घेवून जाणाऱ्या त्याच्या संपर्कातील अन्य चौघांची तपासणीही करण्यात येत आहे.