कोल्हापूर - अनेक तरुणांना इतिहासाबद्दल कुतुहल निर्माण झाले आहे. आपल्या पूर्वजांचा इतिहास जाणून घेण्याची गोडी निर्माण झाली आहे. अनेक घटनांबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद असल्याने आपणच स्वतःहून इतिहास जाणून घेण्याची इच्छा अनेक तरुणांची आहे. त्यासाठी मोडी लिपी अवगत असणे आवश्यक असल्याने मोडी लिपी शिकण्यासाठी अनेक तरुण पुढे येत आहेत.
बाराव्या शकतकापासून सुरू झालेली राज दरबारातील मोडी लिपी 1960 नंतर व्यवहारातूनही मोडीत निघाली. मात्र, आता याच मोडी लिपीची गोडी पुन्हा वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेत ऑनलाइन मोडी शिकण्याकडे आणि शिकवण्याकडे कल वाढल्याचेही दिसून येत आहे. महाराष्ट्रात सुमारे 12 व्या शतकापासून मोडी लिपीची सुरूवात झाली, असे इतिहासकारांचे मत आहे. श्री. हेमाद्रीपंत या लिपीचे जनक होते. यादव काळापासून सुरू झालेला मोडीचा हा प्रवास शिवकाळात बहरला होता. या लिपीचा सर्रास वापर राजदरबाराबरोबरच लोकांच्या दैनंदिन जीवनातही होत असे. 20 व्या शतकाच्या अखेरपर्यंत मोडी लिपी होती. महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये 1960 पर्यंत मोडी शिकवली जाई. मात्र, छपाईच्यादृष्टीने तिची मर्यादा लक्षात घेवून काळाच्या ओघात मोडी लिपी नाहीशी झाली.
मोडी लिपीचा सर्वात जास्त प्रसार आणि प्रचार शिवकाळात झाला. आजही शिवकाळातील व पेशवाई काळातील कागदपत्रे पाहिली तर बहुसंख्य कागदपत्रे ही मोडी लिपीतूनच असल्याचे दिसून येते. खासगी संस्था, शासकीय-निमशासकीय कार्यालये विशेषत: जिल्हाधिकारी कार्यालये, तहसिलदार कार्यालये, भूमीअभिलेख कार्यालये, नगरपालिका या ठिकाणी जुने दस्ताऐवज मोडी लिपीत आहेत. अभिलेखागारातील या कागदपत्रांचे वाचन व्हावे, इतिहास संशोधनास प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाने मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचा उपक्रम हाती घेतला. तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते याचा 3 डिसेंबर 2003 रोजी शुभारंभ झाला.
मोडी लिपी शिकण्यासाठी काय करावे?
राज्य शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने मोडीचे प्रशिक्षण देण्यात येते. 10 दिवसांच्या या प्रशिक्षणानंतर 100 गुणांची लेखी परीक्षा होते. उत्तीर्ण होण्यासाठी कमीत-कमी 50 गुणांची आवश्यकता असून, उत्तीर्ण होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रही देण्यात येते. याबाबत कोल्हापूरमध्ये डिसेंबर 2019 मध्ये प्रशिक्षण घेण्यात आले. मर्यादित प्रवेश असतानाही या प्रशिक्षणासाठी मोठा प्रतिसाद मिळाला होता.
डिजिटल मीडियावर मोडी लिपीचे प्रशिक्षण -
पुणे येथील सी डॅकच्यावतीने ‘मोडी लिपी शिका’ हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत पध्दतीने मोडी लिपीची माहिती दिली आहे.
श्रीमंत उदयसिंह राजे यादव व आदित्य माने यांनी प्रशिक्षणासाठी लिहिले पुस्तक -
कोल्हापुरातील सम्राट देवगिरी यादव राज्याचे वंशज श्रीमंत उदयसिंह राजे यादव यांनी देखील मोडी लिपीवर संशोधन केले आहे. त्यांची श्री मोडी लिपीमधील श्री अंबाबाईचे मोडी कागदपत्रे चार खंड, क्रीडाविश्व मोडी लिपी, मोडी प्रशिक्षण, राजर्षी शाहू महाराज यांची मोडी कागदपत्रे आदी विषयांवर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आदित्य माने या मोडी लिपी प्रेमी विद्यार्थ्याने इयत्ता आठवीपासून स्वत:ला मोडी लिपीची गोडी लावून घेतली. शिवाजी विद्यापीठामधील तसेच पुराभिलेख विभागाचे मोडी लिपी प्रशिक्षण त्याने पूर्ण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आदित्यने ऑनलाइन प्राथमिक मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग घेतला होता. शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते आदित्यने लिहिलेल्या ‘प्रशिक्षण मोडी लिपीचे’ या पुस्तकाचे प्रकाशनही झाले आहे. केवळ प्रशिक्षण देवून न थांबता आदित्यने वीर शिवा काशिद पुण्यस्मरण दिनानिमित्त ऑनलाइन सुंदर मोडी लिपी हस्ताक्षर स्पर्धेचेही आयोजन केले आहे.