कोल्हापूर - डोक्यात हातोडा घालून पत्नीनेच आपल्या पतीचा खून केल्याची धक्कादायक पन्हाळा तालुक्यातील जाखले येथे घटना घडली आहे. संजय तुकाराम घेवदे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर संगीता घेवदे असे पत्नीचे नाव आहे. संजय घेवदे हे वारणा कामगार सोसायटीचे विद्यमान संचालक होते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे घरगुती कारणावरून वाद होत होते. वारंवार होत असलेल्या या वादाला कंटाळून पत्नीने त्यांचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा... धक्कादायक! पोटात गर्भ टिकत नसल्याने पतीने केली पत्नीची हत्या..
प्राप्त माहितीनुसार संजय घेवदे हे पत्नी आणि त्यांच्या एका मुलासोबत जाखले येथे राहत होते. त्यांचा दुसरा मुलगा आपल्या पत्नीसह कामानिमित्त बाहेरगावी असतो. या दोघांमध्ये अचानक वाद झाला. घरात लहान मुलगा सुद्धा नव्हता. याची संधी साधत घरामध्ये देवपूजा करत असताना पत्नी संगीता घेवदे यांनी डोक्यात हातोड्याचे तीन वार केले. त्यामुळे घेवदे जागीच ठार झाले. स्वतः पत्नीने याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात जाऊन कबुली दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन याबाबत अधिक माहिती घेत असून पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जाखलेसह संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.