कोल्हापूर - एखाद्या कार्यकर्त्याची पक्षावर आणि नेत्यांवर नितांत निष्ठा असते. याचाच प्रत्यय कोल्हापूरमध्ये येत आहे. जिल्ह्यातल्या एका शिवसेना कार्यकर्त्यांने जोपर्यंत शिवसेनेचा उमेदवार खासदार होत नाही, तोपर्यंत चप्पल घालणार नाही, असा पण केला आहे.
संजय येसादे असे या कार्यकर्त्याचे नाव असून जिल्ह्यातल्या आजरा तालुक्याचे ते उप तालुकाप्रमुख आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्राध्यापक संजय मंडलिक शिवसेनेचे उमेदवार आहेत. मंडलिक निवडून येत नाहीत, तोपर्यंत पायामध्ये चप्पल न घालण्याचा पण त्यांनी केला आहे. संजय येसादे यांच्या शिवसेनेवरच्या या निष्ठेची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
उन्हाळ्याचे दिवस असतानाही येसादे यांनी घेतलेला हा निर्णय नक्कीच त्यांना त्रासाचा आहे. तरीही पक्षनिष्ठा म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. यावेळी शिवसेनेचाच उमेदवार खासदार होणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.