कोल्हापूर : कोल्हापूर एस.टी. स्टँण्ड ते परीख पुल रोडवर दोन कोटी, एक लाख, पन्नास हजार रुपये किमतीची प्रतिबंधीत असलेली व्हेल माशाची उल्टी ( Whale vomit smuggling ) बेकायदेशीर बाळगून विक्री करीता आलेल्या 3 आरोपींना स्थानिक अन्वेषण विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले. यामध्ये संशयित आरोपी करण संजय टिपुगडे, संतोष अभिमन्यू धुरी, जाफरसादीक महंमद बाणेदार या तिघांचा समावेश आहे. चार नोव्हेंबर रोजी सरनोबतवाडी येथे सुमारे तीन कोटीहून अधिकची व्हेल माशाची उल्टी बाळगणाऱ्या तिघांना अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला होता यामुळे एका आठवड्यात अशी दुसरी मोठी कारवाई करण्यात आली असल्याने व्हेल माशाची उल्टी तस्करीमागे ( Whale vomit smuggling ) मोठ रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केली जात आहे.
अशी आली माहिती समोर - मिळालेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार विनायक चौगुले यांना कोल्हापूर एस.टी. स्टॅण्ड ते परीख पुल जाणारे रोडवर काही व्यक्ती हे प्रतिबंधीत व्हेल माशाची उल्टी (अंबरग्रीस) विक्री करीता घेवून येणार असल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाली. यानुसार पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शन प्रमाणे पथकाने एस. टी. स्टॅण्ड कोल्हापूर ते परीख पुल जाणारे रोडवर जावून सापळा लावला.
अशी केली कारवाई - यावेळी मिळालेल्या माहिती नुसार सुझुकी कंपनीचे पांढरा रंगाचे ॲक्कसेस मोपेड गाडी वरुन आलेले संशयित आरोपी करण संजय टिपुगडे, (वय 27, रा. रामगल्ली, कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर), संशयित आरोपी संशयित आरोपी संतोष अभिमन्यू धुरी, (वय 49, रा. फ्लॅट नं. 01, सुभद्रा टॉवर, लिशा हॉटेल मागे, कदमवाडी रोड, कोल्हापूर) संशयित आरोपी जाफरसादीक महंमद बाणेदार, (वय 40, रा. प्लॉट नं. 27. सुलोचना पार्क, नवीन वाशी नाका, कोल्हापूर) यांना थांबवून तपासणी केले असता त्यांचा कडून एकूण 02 किलो 15 ग्रॅम वजनाचे दोन कोटी, एक लाख, पन्नास हजार रुपये किमंतीचा प्रतिबंधीत असलेला व्हेल माशाचा उल्टी सदृश्य पदार्थ व इतर मुद्देमाल असा एकूण 2,02,20,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला या तर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून अश्याप्रकरची या आठवड्यातील ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली असल्याने या मागे मोठा रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कारवाईत यांचा समावेश - ही कामगिरी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, संजय गोर्ले, सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले, शिवानंद कुंभार तसेच पोलीस अंमलदार विनायक चौगुले, प्रकाश पाटील, हरीष पाटील, संजय हुंबे, ख संदीप कुंभार, नितीन चोथे, शिवानंद मठपती, संजय पडवळ, संतोष पाटील व रफिक आवळकर तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस अमंलदार प्रदीप पावरा यांचेसह वन अधिकारी रमेश शंकर कांबळे व वनपाल विजय ईश्वरा पाटील यांनी केली आहे.