कोल्हापूर - मोठ्या आणि आलिशान महागड्या कार चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला कोल्हापूर पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या आहेत. ( Vehicles Thieves Arrested by Kolhapur police ) पाच कोटी पाच लाख रुपये किंमतीच्या 31 आलिशान मोटारी हस्तगत करण्यात आल्या आहेत. ( 31 Car Seized by Kolhapur Police ) जहीर अब्बास अब्दुल करीम दुकानदार (वय-42, रा. क्रॉस मशीद गल्ली, गांधीनगर, जिल्हा बेळगाव), यश प्रशांत देसाई (वय-26, रा. बोरमाळ, शहापूर, जिल्हा बेळगाव), खलील महंमद लियाकत सारवान (वय-40, रा. सुभाषनगर, जिल्हा बेळगाव) यांचा समावेश आहे.
आंतरराज्य टोळीने नवीन आणि महागड्या आलिशान मोटारी चोरून कारच्या नंबर बदलून त्याची विक्री केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह मणिपूरमधील गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केली. या सर्व गाड्या वेगवेगळ्या राज्यातील असून यात प्रामुख्याने आसाम, राजस्थान, पश्चिम बंगाल, दिल्ली येथील आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव व त्यांच्या टीमने ही कारवाई केली.
अशी केली अटक -
कार बनविणारे कंपन्यांनी कार चोरीस जावू नये याकरीता अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसीत करून कार बनवत असताना मात्र अलिकडील कालावधीत कार चोरीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे याच्यावर त्वरित नियत्रंण मिळावे म्हणून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहरासह जिल्ह्यात घडत असलेल्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून यापूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना आरोपी जहीर अब्बास हा आरोपी गुन्ह्यातील चोरलेली गाडी विकण्याकरीता ६ जानेवारीला कोदाळी (ता. चंदगड) येथील ग्रीन हील रिसॉर्ट या हॉटेलजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून तेथे सापळा रचून ग्रीन हील रिसॉर्टचे पार्किंगमध्ये जहीर अब्बास व त्याचे 2 जोडीदार यश देसाई आणि खलीद महंमद सारवान यांना ताब्यात घेतले. तसेच गुन्ह्यातील चोरीस गेले स्वीफ्ट डिझायर गाडीसह इतर राज्यातील चोरीच्या 07 चारचाकी गाड्याही त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आले आहेत. यानंतर आरोपी खलीद महंमद याची चौकशी केली असता त्याच्याकडून आणखी 5, अशा एकूण 13 चोरीच्या गाड्या जप्त केल्या.
हेही वाचा - Counting Of Votes Kolhapur District Bank : मतपेट्यांमधून नेत्यांना चिठ्ठ्या लिहून मतदारांकडून कानपिचक्या
या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपी यश देसाई याचा चुलता आकाश देसाई हा कर्नाटक राज्यातील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने ग्रीन हील रिसॉर्ट चालवायला घेतले आहे. तर आकाश देसाई याचा साथीदार राजकुमारकिरण सिंग, रा. मणिपूर याने बाहेरील राज्यातील चोरलेल्या चारचाकी गाड्या या आकाश देसाईच्या सहाय्याने नंबर प्लेट बदलून ग्रीन हील रिसॉर्ट येथे आणून ठेवत असत. तसेच या गाड्या जहीर अब्बास आणि खलीद महंमद यांच्या मदतीने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात विक्री करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तर आकाश देसाई याच्या मार्फत विक्री केलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या व मॉडेलच्या आणखी 18 चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. आता पोलिसांमार्फत सर्व गाड़ी मालकांचा व दाखल गुन्ह्यांचा शोध घेण्यास सुरू केले आहे.
आतापर्यंत पाच कोटींच्यावर मालमत्ता जप्त; अजून गाड्या मिळण्याची शक्यता -
अटक केलेल्या आरोपींकडून तपासमध्ये इतर गुन्ह्यातील चोरीस गेलेले गाडीसह महाराष्ट्र व इतर राज्यातील एकूण 5,05,50,000/- रूपये (पाच कोटी, पाच लाख, पन्नास हजार रूपये) किंमतीच्या 31 चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. त्यामध्ये फॉरच्युनर 03, इनोव्हा 09 किया सेल्टॉस- 03, हुंडाई क्रेटा- 07, इरटिगा 01, स्कॉर्पिओ 01 ब्रीझा 02, स्वीफ्ट डिझायर 05 अशा गाड्या आहेत. तर पुढील तपास अजून देखील सुरू आहे. यात अजून ही गाड्या मिळतील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यांनी केले कारवाई -
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, असिफ कलायगार, सुरेश पाटील, विनोद कांबळे, अनिल जाधव, संजय पडवळ, अनिल पास्ते, संतोष पाटील, रणजीत पाटील व राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे. ही मोठी कारवाई केल्याने पोलीस अधीक्षक शैलेश यांच्याकडून 35000 रुपयाचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे.