कोल्हापूर- प्रायोगिक तत्वावर १८ ते ४४ वर्षावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस आजपासून देण्यात येणार आहे. केवळ आजच्या दिवशी हे लसीकरण दुपारी दोन नंतर सुरू होणार असून उद्यापासून पुढील सहा दिवस नियमीतवेळेत लसीकरण केले जाणार आहे. आज दुपारपर्यंत ही लस केंद्रावर पोहचवली जाणार आहे. त्यानंतर या लसीकरण सुरू होणार आहे. आजच्या दिवशी जिल्ह्यातील पाच केंद्रावर ही लस दुपारी दोन नंतर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना देण्यात येणार आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत महत्वाकांक्षी कोवीड लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यामध्ये हेल्थकेअर वर्कर व फ्रंटलाईन वर्कर, यांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यामध्ये ४५ वर्षावरील सर्व नागरिकांचा लसीकरणासाठी समावेश करण्यात आला आहे. कोवीड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे शासनाने घोषित केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक १ मे २०२१ रोजी प्रायोगिक तत्वावर ग्रामीण रुग्णालय शिरोळ, वसाहत रुग्णालय गांधीनगर, ग्रामीण रुग्णालय कागल, प्राथमिक आरोग्यकेंद्र भेडसगांव ता. शाहुवाडी, भगवान महावीर दवाखना, विक्रमनगर कोल्हापूर या पाच शासकीय संस्थेच्या ठिकाणी १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करुन शुभारंभ होणार आहे.
लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी येतांना केंद्रशासनाच्या cowin portal वर ऑनलाइन नोंदणी करुन ऑनलाइन भेट निश्चित (तारीख व वेळ ) झाल्यावर निवडलेल्या लसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. येतांना सोबत आधार कार्ड व फोटो असलेले कोणतेही ओळखपत्र घेवून यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाइन नोंदणी आणि ऑनलाइन भेट निश्चित नसलेल्या नागरिकांना लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, अशी सूचना देण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणी करताना नागरिकांनी १८ ते ४४ हा वयोगटांची निवड करुन नोंदणी करायची आहे. ऑनलाइन नोंदणी मर्यादित असून दिवसाला केवळ २०० लाभार्थ्यांचं लसीकरण होणार आहे. हे प्रायोगिक तत्वावरील लसीकरण केंद्र पुढील सात दिवस ७ मे पर्यंत वरील पाच ठिकाणीच सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
हेही वाचा - जळगाव जिल्ह्यासाठी कोरोना लसीचे 15 हजार डोस प्राप्त; लसीकरणाची थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू