कोल्हापूर - जिल्ह्यातील धरण क्षेत्रात गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे दोन दरवाजे पुन्हा उघडले आहेत. शिवाय राजाराम बंधाराही यंदाच्या पावसाळ्यात पाचव्यांदा पाण्याखाली गेला आहे. सध्या राधानगरी धरणातून 4 हजार 256 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून पंचगंगा नदीच्या पाणीपातळीतही कमालीची वाढ झाली आहे.
कोल्हापूर शहरात मात्र पावसाची उघडझाप सुरुच
जिल्ह्यात मागील 48 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, कोल्हापूर शहरात सकाळपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने राधानगरी, आजरा, चंदगड, पन्हाळा आदी भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होत असतो. गेल्या काही तासांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.
अतिवृष्टीचा इशारा; प्रशासनाच्या सुचनांकडे लक्ष द्यावे
भारतीय हवामान खात्याने बुधवारी (दि. 8 सप्टेंबर) कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानुसार जिल्ह्यामध्ये घाट भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे नागरिकांनी लक्ष द्यावे व सूचनांचे पालन करावे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले आहे. शिवाय आपल्या गावात, परिसरात अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बाह्य मदतीची गरज असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
हे ही वाचा - कोल्हापूरमध्ये 'बीजांकुर गणेशाला' यंदा ग्राहकांची पसंती