कोल्हापूर - कागल तालुक्यात हत्तीने धुमाकूळ घातला आहे. सेनापती कापशी गावच्या वेशीवर टस्कर हत्ती पहायला मिळाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तीने तमनाकवाडा-कापशी गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. याबाबत वन विभागाला माहिती देऊनही अधिकारी-कर्मचारी आले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही दुर्घटना होण्या अगोदरच बिथरलेल्या टस्कर हत्तीचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
कोल्हापुरातल्या चंदगड, आजरा आणि राधानगरी तालुक्यात हत्तींचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. याठिकाणी अनेक वेळा हत्तींनी शेतीचे नुकसान केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, कागल तालुक्यात आतापर्यंत हत्तींचा वावर नव्हता. मात्र, आता याठिकाणीही हत्तीने शिरकाव केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हत्ती वाट चुकला असण्याची शक्यता -
वाट चुकल्यामुळे हा हत्ती कागलमध्ये आल्याची शक्यता प्राणी प्रेमी आणि अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. या परिसरात पहिल्यांदाच टस्कर हत्ती पहायला मिळाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासून नागरिकांनी हत्तीला उकवण्याचा प्रयत्न केल्याने हत्ती बिथरला आहे. स्थानिकांनी हत्ती पाहायला गर्दी केली आहे.