कोल्हापूर- सर्व स्थापन दुकाने सुरू करण्याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी आक्रमक झाला आहे. व्यापार कसा करायचा? आम्हाला चांगलं माहिती आहे. राज्य सरकारने आमची काळजी करण्याची गरज नाही. सोमवारी कोणत्याही परिस्थितीत आम्ही सर्व दुकाने सुरू करणार असल्याचा इशारा कोल्हापुरातील व्यापारी संघटनेने दिला आहे. आज याबाबत जनता बाजार चौकात राज्य सरकारच्या विरोधात व्यापाऱ्यांनी निदर्शने केली.
दोन शहरात परवानगी द्यावी
गेल्या तीन महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी संघटनेने केली. मात्र कोल्हापुरात कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिकच वाढत असल्याने निर्बंध कायम ठेवले आहेत. या बैठकीत व्यापारी संघटनेने कोल्हापूर आणि इचलकरंजी शहराचा आरटीपीसीआर पॉझिटिव्हिटी दर निश्चित करावा. जिल्ह्यापासून या दोन शहरांचा स्वतंत्र अहवाल राज्य सरकारला पाठवून शहर मर्यादित व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
माझा व्यापारी माझी जबाबदारी
कोरोनाचे संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण व टेस्टिंग वाढवावी. हे पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने लसीकरण मोहीम अधिक गतिमान करावी, अशी मागणी देखील व्यापाऱ्यांनी केली आहे. टेस्टिंगची संख्या वाढवून पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्याची मागणी देखील व्यापाऱ्यांनी केली आहे. मात्र आता व्यापारी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. राज्य सरकारने आमची काळजी करू नये,आता व्यापारी आपली दुकाने स्वतः सुरू करेल. असा इशारा देत माझा व्यापार माझी जबाबदारी ही मोहीम सुरू केली आहे
व्यापारी संघटनेच्या मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर
कोल्हापूर महानगरपालिका व कोल्हापूर महानगर विकास प्राधिकरण क्षेत्र याचे एक युनिट धरुन येथील सर्व प्रकारची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी व्यापारी संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते. सर्व दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्याबाबत व्यापारी संघटनेच्या मागणीच्या प्रस्तावावर राज्य शासन स्तरावर निर्णय घेण्यासाठी हा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविण्यात येईल, असा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत योग्य तो निर्णय घेऊन तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे.
तर कारवाई करू
दरम्यानच्या कालावधीत राज्य शासनाने बंदी आदेशाबाबत घेतलेला निर्णय सर्व जिल्ह्यांना सारखाच लागू आहे. स्तर 4 चे निर्बंध कोल्हापुर प्रमाणे इतर 6 जिल्ह्यांनाही लागू असल्याने त्याचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे बंदी आदेशांचे उल्लंघन केल्यास किंवा उल्लंघन करण्यास प्रोत्साहन दिल्यास साथ रोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही निर्देश देण्यात आले आहेत.