कोल्हापूर- पुराच्या पाण्याखाली गेलेल्या गावांचे नवीन जागेत पुनर्वसन करणार, अशी घोषणा महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली. आंबेवाडी येथील पूरग्रस्तांना 1989 च्या पुरामध्ये सोनतळी येथे देण्यात आलेले प्लॉट संबंधितांच्या नावावर करुन दिले जातील, तसेच घरबांधणीसाठी प्रत्येकी अडीच लाख रुपये दिले जातील, अशी घोषणा सुद्धा महसूलमंत्री पाटील यांनी केली. जिल्ह्यातील अनेक भागांत पूरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी ते बोलत होते.
करवीर तालुक्यातील आंबेवाडी आणि हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव या पूरग्रस्त गावाची पाहणी करुन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकांना दिलासा दिला. निलेवाडी येथे पूरग्रस्त गावकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. तर आंबेवाडीला वारंवार पुराचा धोका उद्भवत असून त्यांना सोनतळी येथे घरे बांधून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. चंद्रकांत पाटील म्हणाले की, घरांच्या उभारणीसाठी पैसा कमी पडणार नाही, मात्र सोनतळी येथे घरांची उभारणी केल्यानंतर त्यांनी पावसाळ्याचे 4 महिने आपल्या गुरासह तेथे स्थलांतरीत होणे आवश्यक आहे. पालकमंत्र्यांच्या या आवाहनास उपस्थित ग्रामस्थांनी सहमती दर्शविली. यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येवून सर्वानुमते सोनतळी येथे घरांच्या उभारणीबाबत निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. तसेच तहसिलदारांना यासाठी घरांसाठीचा आराखडा तयार करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिली.