कोल्हापूर - राज्यसभा निवडणुकीचा ( Rajyasabha Election Result ) निकाल लागला आणि धनंजय महाडिक ( Dhananjay Mahadik Won Rajyasabha Election 2022 ) यांच्या रूपाने कोल्हापूर जिल्ह्याला तिसरे खासदार ( 3 MP In Kolhapur ) मिळाले. कोल्हापूर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदार संघ आहेत. त्याठिकाणी शिवसेनेचे दोन खासदार आहेत. आता राज्यसभेवर धनंजय महाडिक यांची निवड झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याला पुन्हा तीन खासदार मिळाले आहेत. एकीकडे जिल्ह्याला जरी तीन खासदार असले तर एक गंमतशीर बाब म्हणजे हे तीनही खासदार कोल्हापूर शहरातील एकाच कॉलनीत राहतात एव्हढेच काय तर प्रत्येकांची घर केवळ 50 ते 100 फुटांच्या अतंरावर आहेत.
धैर्यशील माने यांचा 'आशीर्वाद व्हीला' - हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे मूळचे रुकडी गावचे आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून ते कोल्हापूरातील रुईकर कॉलनी येथे राहतात. याठिकाणी त्यांचा 'आशीर्वाद व्हीला' नावाचा बंगला आहे. जवळपास गेल्या 40 वर्षांपासून माने परिवार याच ठिकाणी राहत आहेत. अगदी आजोबा बाळासाहेब माने यांच्यापासून आई निवेदिता माने ते स्वतः विद्यमान खासदार धैर्यशील माने असे तीन पिढ्यांमधील खासदार याच बंगल्यामधून आपला मतदारसंघ संभाळत आहेत. दररोज घरामध्ये मतदारसंघातील अनेक लोकं आपले प्रश्न तसेच समस्या घेऊन येत असतात. त्यामुळे या बंगल्याला विशेष ओळख आहे. बंगल्याच्या दारातच जनता दरबार भरतो. तिथेच धैर्यशील माने अनेकांच्या समस्या जाणून घेताना पाहायला मिळत असतात. आता तर त्यांनी बंगल्यामध्येच आलिशान कार्यालय केले असून तिथूनच संपूर्ण काम ते सांभाळत आहेत.
खासदार संजय मंडलिक यांचा 'मंडलिक बंगला' - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक हे सुद्धा गेल्या 20 ते 25 वर्षांपासून रुईकर कॉलनी मध्येच राहतात. त्यांचे वडील लोकनेते सदाशिवराव मंडलिक हे सुद्धा याच बंगल्यात राहायचे. बंगल्यापेक्षा बंगल्याच्या सभोवती मोकळी जागा जास्त असे त्यांच्या बंगल्याचे स्वरूप आहे. या बंगल्यात राहत असताना त्यांनी एकूण चार निवडणुका लढविल्या. यामध्ये 2004, 2009, 2014 आणि 2019 यामध्ये 2004 आणि 2009 वेळी सदाशिवराव मंडलिक निवडून आले होते तर 2014 साली संजय मंडलिक यांनी निवडणूक लढवली मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र 2019 साली त्यांनी आपल्या घरासमोरच राहणाऱ्या आणि सद्या राज्यसभेवर निवडून गेलेल्या धनंजय महाडिक यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. त्यामुळे मंडलिक यांच्या बंगल्यात सुद्धा कार्यकर्ते आणि मतदारसंघातील लोकांची नेहमी वर्दळ असते. निवडणुकांमध्ये सुद्धा या बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी मोठा मंडप घातलेला असतो. दरम्यान, सध्या याच बंगल्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे.
खासदार धनंजय महाडिक यांचाही बंगला - धनंजय महाडिक हे सुद्धा मूळचे सोलापूरचे. मात्र, आपल्या परिवारासोबत ते गेल्या अनेक वर्षांपासून ते कोल्हापूरात राहतात. कोल्हापूरातील याच रुईकर कॉलनी मध्ये ते राहतात. येथे त्यांचा 'भीमा' नावाचा आलिशान बंगला आहे. 2002 साली ते या बंगल्यामध्ये राहायला आल्याची माहिती आहे. त्यानंतर 2004 साली त्यांनी या बंगल्यात राहत असताना पहिली निवडणूक लढवली होती. त्यानंतर विविध निवडणुका त्यांनी याच बंगल्यात राहत असताना लढवल्या. अनेक निवडणुकांमध्ये यश आले तर काहींमध्ये अपयश आले. 2014 साली ते खासदार झाले तर 2019 च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. मात्र, राज्यसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले आणि पुन्हा खासदार झाले आहेत. अशा अनेक निवडणुकांचा भीमा बंगला एक महत्वाचा साक्षीदार आहे.
कॉलनीतील भव्य मैदानाच्या भोवती तिघांचे बंगले - दरम्यान, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने आणि खासदार धनंजय महाडिक या तिघांचे सुद्धा बंगले येथील रुईकर कॉलनीच्या मुख्य मैदानाच्या सभोवती आहेत. अगदी हाकेच्या अंतरावर जिल्ह्यातील तीनही खासदारांची घरं असल्याने ही एक विशेष बाब मानली जाते.