कोल्हापूर - भाकपचे नेते व ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणी आणखी तीन आरोपींना विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केली. मुंबई, पुणे येथून या आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपी सचिन अंदुरे याला पुणे येथील कारागृहातून तर अमित बद्दी आणि गणेश मिस्किन याला मुंबई येथील ऑर्थर रोड कारागृहामधून ताब्यात घेण्यात आले होते. या आरोपींना आज कोल्हापूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. तीनही आरोपींनी न्यायालयाने 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
यावेळी आरोपी सचिन अंदुरे याने न्यायालयात धक्कादायक खुलासा केला. मी सीबीआय कोठडीत असताना पोलीस अधिकाऱ्याने माझा छळ केला. मध्यरात्री 3 वाजेपर्यंत तिरुपती काकडे यांनी मला त्रास दिला, असा धक्कादायक खुलासा सचिन अंदुरे याने केला. याबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती आरोपी सचिन अंदुरे याने न्यायालयात दिली.
सचिन अंदुरे हा नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी आहे. तर, अमित बद्दी आणि गणेश मिस्किन हे कन्नड लेखक व विचारवंत एमएम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणातील संशयित आरोपी आहेत.
१६ फेब्रुवारी 2015 ला पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर दुचाकीवर आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. कोल्हापुरातील त्यांच्या घराजवळच ही घटना घडली होती. घटनेच्या चार दिवसानंतर गोविंद पानसरेंचा रुग्णालयात मृत्यू झाला होता.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा सदस्य डॉ. विरेंद्र तावडे याला 2 सप्टेंबर 2016 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी आणखी एक आरोपी समीर गायकवाड याला 16 सप्टेंबर 2016 रोजी अटक करण्यात आली होती. डॉ. विरेंद्र तावडे व समीर गायकवाडच्या चौकशीतून सारंग अकोळकर, विनय पवार यांच्यासह अन्य चार संशयिताची नावे निष्पन्न झाली होती. त्यानुसार एसआयटीने अमोल काळेला १५ नोव्हेंबर २०१८, वासुदेव सुर्यवंशीला १ डिसेंबर २०१८, भरत कुरणेला १ डिसेंबर २०१८ आणि अमित देगवेकरला १५ जानेवारी २०१९ मध्ये अटक केली होती.
कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येसाठी मास्टरमाईंड डॉ. वीरेंद्र तावडे यांनी अमोल काळेसह चारही मारेकऱ्यांवर वेगवेगळी कामगिरी सोपवली होती. बाँबस्फोट घडविण्यासह बंदूक चालविण्याच्या प्रशिक्षणाचीही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. तर देगवेकरवर कॉम्रेड पानसरे यांचे निवासस्थान, बिंदूचौकातील कार्यालयाच्या रेकीची जबाबदारी सोपविण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे.
आतापर्यंत गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे -
समीर विष्णू गायकवाड
वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे
विनय बाबुराव पोवार (फरार)
सारंग दिलीप अकोळकर (फरार)
अमोल अरविंद काळे
वासुदेव भगवान सूर्यवंशी
भरत जयवनच्या कुरणे
अमित रामचंद्र देगवेकर
शरद भाऊसाहेब कळसकर