कोल्हापूर - राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंग सिंह कोश्यारी यांना विमानप्रवास नाकारल्याने भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सूड भावनेचा अतिरेक झाला असून राज्यपालांना जर विमानात बसू दिले जात नसेल, तर हा संविधानाचा गळा घोटण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने करत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबतची माहिती नसेल, असे वाटत नाही, असा टोलादेखील त्यांनी अजित पवारांना लगावला. आज ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
भारताला आत्मनिर्भर करणारा अर्थसंकल्प -
अर्थसंकल्पाचा अभ्यास न करता महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारवर टीका सुरू केली आहे. कठीण काळातसुद्धा देशाचा आत्मविश्वास वाढवणारा हा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला रस्त्यांसाठी एक लाख कोटी पेक्षा जास्त बजेट दिले आहे. इंजाळ प्रकल्पासाठी तीन हजार कोटी दिले आहेत. पाच ते सहा पटीने जास्त तरतूद करूनदेखील विरोधक टीका करत आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला. या अर्थसंकल्पातून भारत कसा आत्मनिर्भर होईल, याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने केला आहे. कर दात्यांची काळजीदेखील या अर्थसंकल्पात घेतली आहे, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्राच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता आल्या असल्याची टीका महाविकासआघाडीतील नेत्यांनी केली होती.