कोल्हापूर - महापुरात कोल्हापूरमध्ये अनेक चोरटे बाहेर पडले आहेत. नुकतेच येथील बावडामध्ये १७ लाखांच्या ८० तोळे दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली. कसबा बावड्यात पुराचे पाणी आल्याने येथील माळी कुटुंबीय आपल्या नातेवाईकांच्या घरी राहयला गेले. या घरात जवळपास ५ ते ६ फूट पुराचे पाणी होते, असे असतानाही चोरट्यांनी घरात शिरून दागिन्यांवर डल्ला मारला.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की बावड्याच्या पूर्वेस माळीमळा परिसरात माळी यांची ९ घरे असून त्यापैकी ८ घरात ४० लोक राहतात. पुराच्या पाण्यामुळे ४ दिवसांपूर्वी शेजारीच असलेल्या गुऱ्हाळ घराचा काही भाग पडला होता. पाणी घरात आल्याने त्यांनी सर्व महिलांना आपल्या माहेरी पाठवले. तर पुरुष मंडळी बावड्यातील आपल्या मित्रांच्या घरी राहण्यास गेले.
गुरुवारी ही चोरी झाल्याची शक्यता असून शुक्रवारी पुराचे पाणी कमी झाल्यावर गुऱ्हाळ घर संपूर्ण पडले. तर घर का पडले हे बघण्यासाठी अजिंक्य माळी आणि त्यांचे भाऊ गेले. त्यावेळी त्यांना घराचे कडी-कोयंडा तोडल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी याची कल्पना पोलिसांना दिली.
पोलिसांनी डॉग स्कॉड आणले. पण पुराचे पाणी असल्याने ते घरात आत जाऊ शकले नाहीत. याबाबत घरातील महिलांना किती दागिने होते याबाबत विचारणा केली असता त्यांनी जवळपास ८० तोळे दागिने असल्याचे सांगितले. या घटनेनंतर आजूबाजूचे सर्वच लोक घाबरून गेले असून या परिसरात पोलिसांनी गस्त सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.