कोल्हापूर - घरफाळा (मालमत्ता कर) भरल्याशिवाय जन्म-मृत्यूचा दाखला मिळणार नसल्याबाबतचा कोल्हापूर महापालिकेने आता आदेश काढला आहे. कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने बुधवारी (दि. 16 डिसें.) याच आदेशाची होळी करण्यात आली. कोल्हापूर शहरात घरफाळ्याची कोट्यवधींची रक्कम थकीत आहे. या घरफाळामध्ये घोटाळा झाल्याची प्रकरणही समोर आली आहेत. यामधील दोषींवर कारवाई करून त्यांच्याकडून घरफाळा वसूल करून घ्यावा. मात्र, सामान्य नागरिकांना वेठीस धरून वसुली करू नये, अशी मागणीही कृती समितीच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी आज (बुधवारी) कोल्हापूर महानगरपालिकेच्या समोर निदर्शने करून नवीन आदेशाची होळी करण्यात आली. यावेळी या देशाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली.
तीव्र आंदोलनाचा इशारा
महापालिकेची कोट्यवधींची रक्कम थकीत आहे. ती वसूल केलीच पाहिजे त्याला आमचे दुमत नाही. मात्र, जन्म आणि मृत्यूचा दाखला महत्त्वाच्यावेळी गरजेचा असतो. एकीकडे घरफाळा घोटाळा झाल्याची प्रकरणही समोर आली आहेत. यामधील दोषींवर कारवाई करून त्यांच्याकडून घरफाळा वसूल करून घेतला पाहिजे. मात्र, सामान्य नागरिकांना अशा आदेशामुळे वेठीस धरले जाणार आहे. त्याचा आम्ही विरोध करत असून हा आदेश तातडीने मागे घ्यावा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, अशा इशारा कृती समितीने दिला आहे.
काय आहे या आदेशात ?
कोल्हापूरच्या उत्पन्नवाढीसाठी प्रत्येक विभागाचे काम महत्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने एकमेकांच्या विभागाशी समन्वय ठेऊन महापालिकेच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे शहरातील स्थानिक रहिवाशांपैकी जर कोणी नागरिक जन्म अथवा मृत्यूचा दाखला मागण्यासाठी अर्ज करत असेल तर सर्वात आधी त्या अर्जासोबत चालू आर्थिक वर्षातील संपूर्ण घरफाळा भरला असल्याबाबतचा घरफाळा विभागाचा ना हरकत दाखला असणे गरजेचे आहे. जर तसा दाखला नसल्यास त्या नागरिकांना जन्म-मृत्यूचे दाखले मागणीचा अर्ज स्वीकारू नयेत, असे या आदेशात म्हटले.
हेही वाचा - ..तर कोल्हापूरचा विकास झाला असता; महापालिका निवडणुकीत चंद्रकांत पाटील टार्गेट
हेही वाचा - ..अन्यथा न्यायालयात जाण्याची तयारी, सरपंच परिषदेची आक्रमक भूमिका