कोल्हापूर - जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील बांद्राई धनगर वाड्यावरील रामू भागू लांबोर यांच्या घरामध्ये सोमवारी (दि. 28 सप्टेंबर) रात्री नऊच्या सुमारास बिबट्या शिरला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रामू लांबोर, त्यांची पत्नी, दोन विवाहित मुली व त्यांची चार मुले भीतीने गारठून गेली. मात्र, लांबोर यांच्या प्रसंगावधानामुळे बिबट्याला घरात कोंडून ते सर्वजण सुरक्षित बाहेर पडले. घराच्या खिडकीचा आधार घेऊन बिबट्यानेही जंगलात धूम ठोकली.
लांबोर कुटुंबीयांनी रात्रीच्या सुमारास जेवण उरकले. लांबोर यांच्या पत्नीने झोपण्यापूर्वी परसदारी श्वानाला खायला दिले. ती आत येत असतानाच मागून श्वान पळत घरात आले. त्याच्यापाठोपाठ बिबट्याही होता. शिकारीसाठी श्वानावर दबा धरून बसलेला बिबट्या त्याच्या मागे घरात पोहोचला होता. अंथरुणात झोपलेल्या मुलांच्या अंगावरुन उडी मारून बिबट्या कुत्र्याच्या दिशेने झेपावला. मात्र, हा प्रसंग लक्षात येताच रामू लांबोर यांनी जोराचा आवाज दिला. त्याबरोबर बिबट्या माळ्यावर चढला तर श्वान भीतीने खालीच बसून राहिले.
प्रसंगावधान राखत झोपलेल्या मुलांसह सर्वांना घरातून बाहेर काढले. श्वानही त्यांच्याबरोबर बाहेर आले. दरवाज्याला बाहेरून कडी लावून ते सर्वजण शेजारच्या घरात जाऊन बसले. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी पाटणे वन विभागाला संपर्क करुन कळवले. त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कोल्हापूरहून रेस्क्यू टीमलाही पाचारण करण्यात आले. मात्र, खिडकीचा आधार घेऊन बिबट्याने जंगलात धूम ठोकली होती. नशीब बलवत्तर म्हणूनच लांबोर कुटुंबीयातील कोणत्याही सदस्याला बिबट्याचा सामना करावा लागला नाही. हा बिबट्या जंगलात सुखरूप गेला आहे. तसेच कोणत्याही प्राणी किंवा मनुष्याला इजा झालेली नाही. या सर्व परिस्थितीवर वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावे. कोठेही बिबट्या आढळला तर तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन परिक्षेत्र वन अधिकारी पी.ए.आवळे यांनी केला आहे.
हेही वाचा - वर्षभरापूर्वी झाले होते लग्न, १९ वर्षीय पत्नीने 'या' कारणासाठी केली आत्महत्या