कोल्हापूर - मुलगी झाल्यानंतरचा आनंद काय असतो ते कोल्हापूर जिल्हातल्या चावरे गावातल्या घोडके (महाडिक) कुटुंबाने दाखवून दिले आहे. त्यांनी मुलीचे स्वागत चक्क हत्तीवरून मिरवणूक काढत केले आहे. एवढेच नाही तर ढोल ताशा, मर्दानी खेळ आणि गाव जेवण सुद्धा घालण्यात आले आहे. या अनोख्या स्वागताची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
जल्लोषात स्वागत
कोल्हापूरातल्या हातकणंगले तालुक्यातील चावरे गावातील दीपक गणपतराव घोडके (महाडिक) आणि दीपिका घोडके (महाडिक) यांना एक मुलगा आहे. मात्र दुसरे अपत्य मुलगीच व्हावी म्हणून त्यांनी प्रार्थना केली होती. शिवाय दीपक घोडके यांचे वडील सुद्धा निवृत्त कॅप्टन आहेत. त्यांच्या घरी मुलीचे आगमन झाले. तिर्था असे तिचे नाव ठेवण्यात आले. मुलगी घरातील लक्ष्मी असते त्यामुळे तिचे जल्लोषी स्वागत करायचे घोडके-महाडिक कुटुंबाने ठरवले. त्यानुसार त्यांनी आपल्या मुलीचे स्वागत हत्तीवरून मिरवणूक काढूनच करायचे ठरवले. त्यानुसार रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास चावरे गावात मुलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. शिवाय सामाजिक संदेश देणारे फलक घेऊन अनेक मुले सुद्धा मिरवणुकीत सहभागी करण्यात आली होती. एवढेच नाही तर शिवकालीन मर्दानी खेळ आणि गावजेवण सुद्धा घालण्यात आले. मुलीच्या या जल्लोषी स्वागताची तालुक्यासह जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.
हेही वाचा - राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज