कोल्हापूर - गेल्यावर्षी केलेल्या सात महिन्यांच्या कडक लॉकडाऊनमध्ये हॉटेल कामगारांचा रोजगार गेला. गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेल सुरूळीत सुरू झाल्याने कामगारांना थोडाफार आधार मिळाला होता. आता पुन्हा हॉटेल्स रात्री आठनंतर बंद केले तर फक्त दोन तासात रोजगार कसा करायचा, असा प्रश्न हॉटेल मालकांना पडला आहे. लॉकडाऊनमुळे कामगारांच्या पोटाचे हाल होत आहेत. त्यामुळे किमान १० वाजेपर्यंत हॉटेल्स धारकांना परवानगी द्यावी, अशी मागणी कोल्हापूर हॉटेल्स संघटनेने केली आहे.
पुन्हा मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार -
राज्य शासनाने रात्री आठनंतर जमावबंदीचे नियम लावल्याने हॉटेल व्यवसायिक पुन्हा अडचणीत आले आहेत. जेवणाची वेळ आठ नंतर सुरू होते. नेमकी त्याच वेळी हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश आहेत. त्याचा थेट परिणाम हॉटेल व्यावसायिकांवर होत आहे. कोरोनामुळे जे जनजीवन विस्कळीत झाले होते. ते पुन्हा पूर्वपदावर येत असताना राज्य शासनाने हा निर्णय लागू केल्याने त्याचा मोठा फटका हॉटेल व्यवसायिकांना बसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ३ हजार हॉटेल्स आहेत. कोल्हापूर शहरातील हॉटेल्सची संख्या १ हजार २०० इतकी आहे. ५ कोटीं रूपयांची एकूण उलाढाल आहे. हॉटेल्स आठ वाजल्यानंतर बंद केले तर मोठे आर्थिक होणार आहे, असे हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर यांनी सांगितले.
कामगारांचे हाल -
रात्री आठवाजल्यानंतर जेवणासाठी नागरिक गर्दी करतात. मात्र, त्याच वेळी हॉटेल बंद झाली तर आमचा व्यवसाय कसा सुरू राहणार? कामगारांचे वेतन कसे देणार? हा प्रश्न आमच्यासमोर आहे. हॉटेल कामगार मोठ्या संकटात आहेत. गेल्यावर्षीच्या कडक लॉकडाऊनमुळे त्यांचे प्रचंड हाल झाले होते. आता पुन्हा तशीच परिस्थिती ओढावण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोन वगळता बाकिच्यांना व्यवसाय करण्यास १० वाजेपर्यंत मुदत द्यावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.
सर्व नियमांत राहून हॉटेल सुरू -
राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत आम्ही व्यवसाय सुरू ठेवला आहे. मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्क्रिनिंग करून ग्राहकांना प्रवेश दिला जातो. दर दोन तासाला संपूर्ण हॉटेल सॅनिटाइज केले जाते. त्यामुळे राज्य शासनाने आमच्या मागण्यांचा विचार करावा, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.