कोल्हापूर - 'ईटीव्ही भारत'च्या बातमीची दखल घेत बहुतांश पूरग्रस्त भाडेकरूंना सानुग्रह अनुदानाची मदत पोहोचल्याचे पूरग्रस्तांनी सांगितले आहे. राज्य शासनाने पूरग्रस्तांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानातील ५ हजार रुपयांची प्राथमिक मदत वाटपाचे काम सुरू होते. त्यावेळी भाडेकरूंना ही मदत मिळत नसल्याचे ईटीव्ही भारतच्या निदर्शनास आले होते. ईटीव्ही भारतने याबाबतचे वृत्तही दाखवले होते.
आदित्य ठाकरे यांनी कोल्हापुरातील बापट कॅम्प, आंबेवाडी, चिखली या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. ठाकरे यांनी पाण्याच्या टाक्या तसेच एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केले होते. दरम्यान, यावेळी आंबेवाडी येथील मारुती मंदिरमध्ये एका महिलेने शासनाची आम्हा भाडेकरूंना मदत मिळत नसल्याची खंत आदित्य ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यावेळी भाडेकरूंना मदत देण्याबाबत काही जीआर नसल्याने आदित्य ठाकरे निरुत्तर झाले होते. यावर आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांनाच मदत मिळेल आणि रेशन कार्ड नसेल तरीही मदत मिळेल, असे वेळ मारून नेत आश्वस्त केले होते.
हेही वाचा- पीएमसी बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खात्यातून केवळ १ हजार काढता येणार
शिंदे यांच्या आदेशावर कृती कितपत होणार याबाबत ईटीव्ही भारतने वृत्त दिले होते. याची दखल घेत भाडेकरूंना सुद्धा सानुग्रह अनुदान वाटपाचे आदेश देण्यात आले होते. ईटीव्ही भारतच्या वृत्तामुळे आंबेवाडी आणि चिखली परिसरातील बहुतांश सर्वच भाडेकरूंना 5 हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची मदत पोहोचल्याचे भाडेकरूंनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. शिवाय उरलेले 5 हजार सुद्धा आमच्या बँक अकाऊंट लवकर जमा होतील, अशी आशा यावेळी पुरग्रस्तांनी व्यक्त केली.
सध्या बहुतांश पूरग्रस्त भाडेकरूंना ही मदत पोहोचली आहे. तसेच बँक खात्यात जे उरलेले 5 हजार रुपये आहेत ते देण्यात येणार आहेत. अजूनही कोणी पूरग्रस्त भाडेकरू मदतीपासून वंचित असतील, तर त्यांची माहिती घेऊन मदत पोहोचविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.