कोल्हापूर - दरवर्षी 15 जूनला सुरू होणारी शाळा कोरोना संकटामुळे अजूनही सुरू झाली नाही. त्याला पर्याय म्हणून राज्य शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा घाट घातला. मात्र, हे ऑनलाईन शिक्षण राज्यातील कानाकोपऱ्यात आणि खेडोपाड्यात पोहोचू शकेल का, याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही.
ऑनलाईन शिक्षणात देण्यात आणि घेण्यात अनेक अडचणी आहेत. मात्र, कोल्हापूरातील काही शिक्षकांनी या अडचणीवर एक नाविन्यपूर्ण उपाय शोधून काढला आहे. त्यामुळे मुलांनाही शिक्षण मिळू लागले आहे. त्यांचा हा उपाय नेमका काय आहे, याचा ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.
हेही वाचा... ईटीव्ही भारत विशेष; ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण 'बोजवारा'; स्मार्टफोन, इंटरनेटची पालकांपुढे समस्या
शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा केंद्र शाळेतील शिक्षक दशरथ आयरे आणि प्रकाश गताडे हे प्रत्येक व्यक्तीला असेला शिक्षणाचा हक्क प्राप्त व्हावा, यासाठी नेहमीच धडपडत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून अजूनही शाळा बंद आहेत. पण राज्य शासनाने ऑनलाईन शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. राज्य शासनाने सूचना दिल्या खऱ्या मात्र शिक्षक कोणकोणत्या भागात शिकवतात? त्या भागात काही प्राथमिक सुविधा तरी आहेत का? याचाही शासनाने कदाचित विचार केला नसावा.
कारण हे दोन्ही शिक्षक ज्या शाळेत शिकवतात, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी साधा रस्ताही नाही. तिथे कसले इंटरनेट आणि कसली ऑनलाईन शाळा ? मुलांच्या पालकांना इंटरनेट म्हणजे काय, हे सांगावं लागते. तिथे ऑनलाईन शाळेचा प्रश्नच येत नाही. मात्र, प्रकाश गाताडे या शिक्षकाने एक नाविन्यपूर्ण असा उपाय शोधून काढला. इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही, अशा गावात जाऊन शिक्षक त्या गावातील चौकात किंवा प्रत्येक गल्लीतील एखाद्याच्या घराच्या दारात फिजिकल डिस्टन्सिंग पाळून मुलांचा अभ्यास घेत आहेत. त्यामुळे मुलांना शाळेत न येता त्यांच्या घराच्या दारातच शिक्षण घेता येऊ लागले आहे.
हेही वाचा... देशात कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली पाच लाख पार, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
या उपक्रमात त्यांनी मुलांकडे अभ्यासाच्या दोन वह्या दिल्या आहेत. एक वही विद्यार्थ्यी अभ्यास पूर्ण करून शिक्षकांकडे देतात आणि दुसऱ्या वहीत अभ्यास लिहून घरी घेऊन जातात. शिक्षक वही जमा करून घेतात दुसऱ्या दिवशी अभ्यास तपासून ती वही मुलांकडे देतात. या पद्धतीने ऑनलाईन शिक्षणापासून दूर असलेली अणुस्कुरा, वाकीचा धनगर वाडा, मोसम, मुसलमान वाडी या चार गावातील मुलांना शिक्षकांनी अनोखा प्रयोग राबवत शिक्षणासोबत जोडले आहे.
हे शिक्षक कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याची काळजी घेत मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करत आहेत. तसेच पालकांना देखील कोरोनाबाबत जागरूक करत माहिती देत आहेत. या अनोख्या प्रयोगामुळे मागील 3 महिने पुस्तकांपासून दूर असलेले विद्यार्थी खुश आहेत आणि पालकही समाधानी आहेत.
शाहूवाडीचे गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांच्यासह केंद्र प्रमुखांनी या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करत दशरथ आयरे, सलीम कागवाडे, प्रकाश गाताडे या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे अनुकरण आता या भागातील अनेक शाळेतील शिक्षक करत आहेत. एकीकडे सगळे जग कोरोना संकटात ऑनलाइन शिक्षणाच्या मागे लागले आहे. मात्र, कोणत्याही तक्रारी न करता त्यातून मार्ग काढत या शिक्षकांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमाची सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.
हेही वाचा... आषाढी वारी..! जगद्गुरू तुकोबांच्या पादुका एसटी बसने जाणार पंढरपूरकडे..