कोल्हापूर : जिल्ह्यात माध्यमिक शाळांच्या वर्गात शिक्षकांना मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. शिक्षक मोबाईलमध्ये व्यग्र असताना शिक्षणावर परिणाम होऊ नये, तसेच शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून हा निर्णय जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. काही शाळेत मोबाईलमुळे अनुचित प्रकार घडल्याने शिक्षण विभागाला ही कडक भूमिका घ्यावी लागली आहे.
अनेक शाळांमध्ये अमंलबजावणी सुरू : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासह, शिस्त पालनसाठी शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी शाळांना एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये शिक्षकांना वर्गात अध्यापन करताना मोबाईल वापरता येणार नाही, अशी सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांना वर्गात जाताना मोबाईल पार्कींगमध्ये आपला मोबाईल जमा करुनच अध्यापन करायचे आहे. या निर्णयाची काटेकोरपणे अमंलबजावणी श्री योगी प्रभुनाथ महाराज हायस्कूलसह अनेक शाळांमध्ये सुरू झाली आहे. दरम्यान, या निर्णयाचे स्वागत करत शैक्षणिक गुणवत्ता वाढण्याबरोबर शिक्षकांमध्ये संवाद सुरू झाल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.
नोंद करूनच शिक्षकांना मोबाईल वापरता येणार : शैक्षणिक साहित्य म्हणून अध्यापनासाठी मोबाईलचा वापर करायचा असल्यास, मुख्याध्यापकांच्या परवानगीने टाचण वहीत नोंद करून संबंधित शिक्षकांना मोबाईल वापरता येणार असल्याचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी सांगितले.
अनुचित प्रकाराला आळा : राज्यासह जिल्ह्यातील काही माध्यमिक शाळांमध्ये मोबाईलवरून मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवण्याचे प्रकार घडले होते. यामुळे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रावर याचा परिणाम दिसू लागला होता. यामुळे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना अध्यापन करताना मोबाईल वापरण्यास बंदी केल्याने, अशा प्रकाराला आळा बसेल. तसेच या निर्णयाचे शाळा व्यवस्थापनाने काटेकोरपणे पालन केल्यास, अध्यापनासह शिक्षणाच्या दर्जामध्ये देखील सुधारणा होईल यात शंका नाही. त्यामुळे या निर्णयाचे पालकांमधून स्वागत होत असून समाधान व्यक्त होत आहे.
हेही वाचा -