कोल्हापूर - माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जगाच्या तुलनेत भारत आणि महाराष्ट्र कोठेही मागे नाही. कोविड काळातही या आजाराचा सामना करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शोधण्यात राज्यातील तंत्रज्ञ काम करत असून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पुढाकाराने तयार केलेले युव्ही-३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोट (तारा) तयार केला आहे. जगात प्रथमच असा रोबो तयार झाल्याचा दावा केला जात असून कोरोनासारख्या असंख्य व्हायरसचा खात्मा करू शकतो. शिवाजी विद्यापीठातील डॉ. आर. सोनकवडे व त्यांचा मुलगा अनिकेत सोनकवडे यांनी हा रोबो तयार केला आहे.
या रोबोटची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे रोबोटमध्ये वापरलेले वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय- आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) होय. मानवी उपस्थितीत मानवी हालचाली अचूकपणे ओळखून तत्काळ अतिनील किरणांचे उत्सर्जन थांबवण्यासाठी यामध्ये पीआयआर सेन्सर वापरला आहे. तसेच खोलीमध्ये फिरताना अडथळ्यांवर थडकून तो खराब होऊ नये, यासाठी अँटीकोलिजन सेन्सर वापरला आहे. निर्जंतुकीकरणाच्या ठिकाणाचे मोजमाप घेण्यासाठी एलआयडीएआर सेन्सर बसवला आहे. त्यामुळे रोबोट त्याच्यामध्ये असणाऱ्या ३६० अंश स्कॅनरच्या साहाय्याने द्विमिती किंवा त्रिमितीमध्ये मोजमाप घेऊन त्यानुसार निर्जंतुकीकरणासाठी लागणारा वेळ स्वतःच निश्चित करतो. प्रभावी निर्जंतुकीकरणासाठी उपयुक्त सिम्युलेशसन्स अँसिस सॉफ्टवेअर प्रा. लि. आणि कॅडफेम यांनी पुरवली आहेत. २० किलोग्रॅम वजन असणाऱ्या या रोबोटची १० बाय १० मापाची खोली अवघ्या ५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत निर्जंतुक करण्याची क्षमता आहे. यामध्ये वापरलेल्या ११ वॅटच्या एकूण १८ UV-C टयूबमुळे कोरोना विषाणूसोबत इतर विषाणू व जिवाणूंचाही नायनाट करणे शक्य होणार आहे.
दोन रंगांचे एलईडी -
रोबोटमध्ये वापरलेल्या लिथियम आयन बॅटरीमुळे चार तास चार्ज केल्यानंतर तो दोन ते अडीच तास कार्यरत राहू शकतो. या रोबोटसाठी बनवलेल्या खास अशा अँड्रॉइड अॅपच्या मदतीने अगदी कुठूनही त्याला चालवणे शक्य आहे. मोबाइल वायफायद्वारे हा काही मीटर अंतरावरून हाताळला जाऊ शकतो. याहीपलीकडे जाऊन हा रोबोट आयओटी (Internet of Things) तंत्रज्ञानाद्वारे अगदी परदेशातूनही चालवता येतो. याव्यतिरिक्त त्याची कार्यस्थिती समजण्यासाठी त्यावर LED बसवले आहेत. हिरव्या रंगाचे LED त्याची चालू स्थिती दर्शवतात तर जेव्हा तो UV-C tube चालू करून निर्जंतुकीकरणाचे काम सूरू करतो तेव्हा लाल रंगाचा LED लागतो.
माणसांशी बोलूही शकतो रोबो -
रोबोटच्या डोक्यावर बसवलेल्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्या ठिकाणची सर्व दृश्ये पाहणेही आपणास शक्य होईल. कोविड -१९ वॉर्ड, मोठमोठे माॕल, रुग्णवाहिका, हॉटेल्स, उपहारगृहे, सार्वजनिक वाहने, खासगी हॉटेल्स, विमानतळ व प्रवाशी कक्ष, रेल्वे, रेल्वेमधील स्वयंपाक कक्ष, धान्य कोठी, घर, कार्यालये, व्यायामशाळा, महाविद्यालये, कारखाने, किरणादुकान, सिनेमागृह, बँक, सार्वजनिक शौचालये आदी ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी हा रोबोट अत्यंत लाभदायक ठरेल. या रोबोटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा आपल्यासोबत बोलूही शकतो आणि कोरोना व इतर विषाणू, सूक्ष्मजीव, विकिरणे, विद्युत चूंबकीय लहरी, अतिनील किरणे अशा अनेक वैज्ञानिक बाबींवर माहितीही देऊ शकतो.
विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या उद्देशाने प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे यांच्या मार्गदर्शनखाली अनिकेत सोनकवडे ,रत्नदीप कांबळे, पवन खोब्रागडे, समीर रामटेके आणि त्यांची टीमने ही संकल्पना सत्यात उतरवली आहे. सध्या हा रोबोट नागपुरात ठेवण्यात आला असून त्याचे ई-उद्घाटन मान्यवरांच्या ऑनलाइन उपस्थितीत आज पार पडले.
उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांचे वयक्तिक लक्ष -
डॉ. सोनटक्के हे या प्रोजेक्ट्सवर काम करत असल्याचे कळताच उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काळजीने लक्ष घातले. कोरोना काळात प्रवासात व साहित्य खरेदीत कोणतीही अडचण येऊ नये. यासाठी राज्य पोलीस प्रशासनाकडून प्रवासासाठी पत्र मिळवून दिले. तर वारंवार या प्रोजेक्टबद्दल माहिती घेऊन योग्य मार्गदर्शन केले.