कोल्हापूर Kolhapur Murder Case : यादव नगर परिसरात शिवकुमार लक्ष्मीनारायण बघेल यांची श्रीराम स्वीट मार्ट नावानं एक बेकरी आहे. गुरुवारी 28 डिसेंबर रोजी दुपारी याच परिसरात राहणाऱ्या संशयित आरोपी प्रथमेश शिंदे आणि दिलीप पाटील यांनी बेकरीतील खाद्यपदार्थ फुकट खायला देत नसल्याच्या रागातून शिवकुमार बघेल यांच्यावर हल्ला करत बेदम मारहाण केली. यावेळी बघेल हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी त्यांचा मृत्यू झालाय.
नागरिकांचे 'रास्ता रोको' आंदोलन : हल्ल्यासंदर्भात शिवकुमार बघेल यांची पत्नी निर्मला बघेल यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार दोन्ही संशयित आरोपींना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे. मात्र, आज दोन दिवसानंतर शिवकुमार बघेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे बघेल कुटुंबियांनी आणि यादव नगर परिसरातील संतप्त झालेल्या नागरिकांनी बघेल यांचा मृतदेह स्वीट मार्ट दुकानासमोरच रस्त्यावर ठेवत 'रास्ता रोको' सुरू केले. यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तर नागरिकांनी येथे मोठी गर्दी करून राजारामपुरी पोलिसांचा निषेध व्यक्त करत पोलिसांवरच आरोप केले आहेत.
आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप : बघेल यांचा मृतदेह दुपारच्या सुमारास उद्यम नगर रस्त्यावरील त्यांच्या दुकानासमोर आणून ठेवत नागरिकांनी 'रास्ता रोको' सुरू केले. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. मात्र, परिसरातील नागरिकांनी पोलिसांवरच आरोप केला की, स्वीट मार्ट चालकाने हप्ता दिला नाही म्हणून गुंडांनी हा हल्ला केला आहे. या परिसरात वारंवार अशा पद्धतीचे हप्ते गोळा करण्यासाठी गुंड येत असतात. यामुळे यापूर्वीही राजारामपुरी पोलिसांकडे या गुंडांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीसच या गुंडांना पाठीशी घालत आहेत. हे सर्व आरोप मृताचे कुटुंबिय आणि स्थानिक नागरिकांनी केले आहेत.
पोलिसांनी फेटाळले आरोप : येथील नागरिकांनी केलेल्या आरोपासंदर्भात राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अशा पद्धतीची कोणतीही तक्रार यापूर्वी आमच्याकडं आलेली नाही. अशी कोणतीही तक्रार असेल तर ती आम्ही घेण्यास तयार आहोत. मात्र, यापूर्वी कोणीही माझ्याकडं तक्रार घेऊन आलेले नाहीत, असं स्पष्टीकरण पोलीस निरीक्षकांनी दिलं आहे.
हेही वाचा:
- सिंगापूरच्या धर्तीवर धारावीचा विकास; अदानी समुहाकडून 'धारावी मास्टर प्लॅन'ची संकल्पना सादर होणार
- झारखंडचे मुख्यमंत्री राजीनामा देणार? हेमंत सोरेन यांच्या पत्नी निवडणूक लढवण्याच्या चर्चा; काय आहे प्रकरण
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या धक्कातंत्रामुळं अनेक खासदार व इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचं वातावरण