कोल्हापूर - विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या यादीतून माझा पत्ता कट केला असे म्हटले जात आहे. याचा मला काहीही फरक पडत नाही. मात्र वेळ आल्यावर एकेकाचे हिशोब चुकते केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. दरम्यान, आमदारकी हे काय माझ्यासाठी साध्य नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पूर्वीसुद्धा रस्त्यावर होतो आणि यापुढे रस्त्यावरची लढाई लढत राहील, असे म्हणत हा विषय आम्ही फार गांभीर्याने घेतला नसल्याचेही त्यांनी म्हटले. पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून पंचगंगा परिक्रमा पदयात्रा सुरू आहे. आज ही पदयात्रा येथील चिंचवाड गावात पोहोचली, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
'राज्यपालांना एक नियम आणि राष्ट्रपतींना एक?
राज्यपालकांकडे दिलेल्या 12 जणांच्या यादीतून नाव वगळण्यात आलेल्या चर्चेबाबत ते म्हणाले, की निवडणुकीत पराभूत झालेल्यांना संधी नाही, असा नियम झाला असेल तर केंद्रात राष्ट्रपती नियुक्त खासदार झालेत आहेत त्याचे काय? मग राज्यात राज्यपालांना एक नियम आणि राष्ट्रपतींना एक नियम आहे का? याबाबत घटनेत काय बदल केला असेल तर मला माहित नाही. त्यामुळे ते सुद्धा समजावे.
'आम्ही जलसमाधी घेतल्यावरच जीआर काढणार का?'
गेल्या दोन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंचगंगा परिक्रमा पदयात्रा आंदोलनाचे आयोजन केले आहे. पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी या पदयात्रेच्या माध्यमातून राजू शेट्टी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. कोल्हापुरातील प्रयाग चिखली येथून सुरू झालेली ही पदयात्रा पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावर म्हणजेच नृसिंहवाडी येथे 5 सप्टेंबर रोजी पोहोचणार आहे. त्याच दिवशी पूरग्रस्त शेतकरी हे जलसमाधी आंदोलन करणार आहेत. आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. मात्र शासनाकडून अद्याप कुठल्याही पद्धतीचा जीआर काढण्यात आला नाही. शिवाय शासनाकडून एकाही प्रतिनिधीने साधा फोन करूनसुद्धा बातचीत केली नाही. त्यामुळे आता आम्ही जलसमाधी घेतल्यावर जीआर घेऊन येणार का, असा सवालसुद्धा शेट्टी यांनी यावेळी राज्य सरकारला केला. शिवाय शेतकरीसुद्धा आता मदतीचा जीआर घेऊन या अन्यथा हजारो शेतकऱ्यांसह जलसमाधी घेऊ, याच पवित्र्यात असल्याचे पाहायला मिळत आहे.