कोल्हापूर - पूरग्रस्त शेतकरी, कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पद यात्रेला सुरुवात होणार आहे. प्रयाग चिखली येथील नदीच्या संगमापासून पदयात्रेला सुरुवात होणार आहे. आपल्या हक्कासाठी या पदयात्रेत सर्वच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केले आहे. दरम्यान, चिखली येथून या पदयात्रेला सुरुवात होणार असून 5 सप्टेंबर रोजी ही पदयात्रा शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे पोहोचणार आहे. त्यादिवशी सर्व शेतकऱ्यांसह जलसमाधी घेणार असल्याचा इशारा सुद्धा शेट्टी यांनी दिला आहे.
जलसमाधी आंदोलनाचा दिला होता इशारा -
आजपासून शेट्टींनी पुकारलेल्या पदयात्रेला सुरुवात होणार आहे. मात्र 23 ऑगस्ट रोजीच पुरग्रस्तांच्या विविध मागन्यांसाठी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेट्टी यांनी हजारो शेतकऱ्यांसह मोर्चाद्वारे धडक दिली होती. शिवाय सरकारला आठ दिवसांची मुदत सुद्धा दिली होती. त्याची मुदत आज संपत आहे. तरीही सरकारने कोणताही निर्णय अद्याप जाहीर केला नाहीये किंव्हा त्याबाबत कोणताही जीआर काढलेला नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. त्यामुळेच हजारो शेतकऱ्यांसोबत पदयात्रेला सुरुवात करणार आहोत आणि 5 सप्टेंबर रोजी नृसिंहवाडी येथे पोहोचल्यानंतर येथे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर सर्वच शेतकऱ्यांसह जलसमाधी घेणार आहोत असेही शेट्टी यांनी म्हटले आहे. दरम्यान, या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सुद्धा शेट्टी यांनी केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शासनाकडे मागण्या -
1) 2019 च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा आणि पूरग्रस्तांच्या मागणीप्रमाणे विनाअट पुनर्वसन करा.
2) कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या मार्गावर असलेल्या पुला जवळचा भराव कमी करून तातडीने कमानी पूल बांधा.
3) पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची सरसकट फी तसेच शैक्षणिक कर्जमाफी करा.
4) 2005 ते 2019 पर्यंत आलेल्या महापुरात झालेल्या नुकनासभरपाईची उपाययोजना करावी.
5) महापुरामुळे शेतकरी व्यापारी उद्योग धंदे आदींचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी वाहून गेल्या असून विहिरी खचलेल्या आहेत. तसेच यंत्रमागधारकांनाचेही खूप मोठे नुकसान झाले आहे. या सर्वांना शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी.
6)महापुराचे पाणी ज्या गावात गेले आहे, त्या संपूर्ण गावाला पूरग्रस्त गाव म्हणून घोषित करून सरसकट सर्वांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे.
7) सामायिक खातेदार असणाऱ्या कर्जदारांचे पंचनामे होत नसल्याने कर्ज खाते ग्राह्य धरून नुकसान भरपाई द्यावी.
8)ज्या शेतकऱ्यांनी कृषी विमा उतरवलेला आहे, त्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई म्हणून विम्याची संपूर्ण रक्कम देण्याचे आदेश विमा कंपन्यांना द्यावेत.