कोल्हापूर - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा दिवसेंदिवस देशातही प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरमध्ये आता स्वॅब तपासणीची प्रयोगशाळा सुरू झाली आहे. येथून पुढे जेवढ्या लोकांचे स्वॅब घेतले जातील, त्यांची तपासणी कोल्हापुरात होणार आहे. दररोज किमान 160 कोरोना टेस्ट आता कोल्हापूरमध्ये घेता येणे शक्य होणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
आयसीएमआरकडून याबाबत अधिकृत परवानगी मिळाली असल्याचेही सतेज पाटील यांनी सांगितले. उद्यापासून या प्रयोगशाळेत अधिकृतरित्या स्वॅब तपासण्या होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये कोरोना संशयितांच्या स्वॅब तपासणीचे अहवाल आता तासाभरात मिळणार आहेत. कोरोना संशयितांचा स्वॅब मिरज येथील लॅबमध्ये पाठवण्यात येत होता. मात्र, तेथील संख्येबाबत पडणारी मर्यादा लक्षात घेऊन जिल्ह्यामध्ये नवीन लॅब सुरु करण्यात आली आहे. ही लॅब शेंडापार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यान्वीत झाली आहे. त्यामुळे संशयीतांची तपासणी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा स्वयंपूर्ण झाला आहे.