कोल्हापूर - जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात संभाजीपूर ग्रामपंचायतीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उपसरपंचांकडे तब्बल ७५ लाख रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाने केलेल्या कारवाईत ही बाब समोर आली आहे. बरकत गवंडी असे त्या उपसरपंचाचे नाव आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने बरकत गवंडी आणि त्यांचे भाऊ गणी गवंडी यांच्या दुकान आणि गोडाऊनवर छापा टाकला होता. यावेळी पथकाला दुकानात ही रक्कम आढळून आली.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम सापडल्याने या निवडणुकीत पैशाचा बाजार करण्याच्या हेतूनेच इतकी प्रचंड रक्कम आणण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, एवढी मोठ्या प्रमाणात रक्कम सापडली असल्यामुळे यामागे कोणत्या राजकीय पक्षाचा हात असेल त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरातील बाराव्या गल्लीत गवंडी यांचे टोबॅको नावाचे दुकान आहे. तर संभाजीपूर येथे गोडाऊन आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने आणि जयसिंगपूर पोलिसांच्या पथकाने मिळुन संयुक्तरित्या मंगळवारी सायंकाळी अचानक या दोन्ही ठिकाणी छापा टाकला. स्वाभिमानीच्या उपसरपंचाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम सापडल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढणार असल्याचे चित्र आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आयकर विभाग आणि पोलीस करत आहेत.