कोल्हापूर : कोल्हापूरच्या रस्त्यांबद्दल बोलायचा काही प्रश्नच नाही. कारण आजपर्यंत इथल्या रस्त्यांमुळे हजारो नागरिकांचे अपघात झाले आहेत तर, अनेकांना कायमस्वरूपी अधू होण्याची वेळ आली आहे. पुन्हा एकदा कोल्हापूरातील याच रस्त्यामुळे एका महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका वेळेत न आल्याने शेवटी दुसऱ्या गाडीतून नेट असताना रस्त्यातच ऊसतोड महिलेची प्रसूती झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी ही घटना घडली असून बाळाला जन्म दिल्यानंतर महिलेला खुरप्यानेच नाळ कापावी लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. किरण केसू पालवी (रा. खारी, तालुका खालवा, जिल्हा खांडवा, मध्यप्रदेश) असे प्रसूती झालेल्या महिलेचे नाव आहे. सध्या बाळ, आई दोघांचीही प्रकृती ठीक असून त्यांच्यावर मुरगुड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खराब रस्ते आणि हादरे : मध्यप्रदेश मधील पालवी परिवार काही महिन्यांपासून रयत साखर कारखान्याकडे ऊस तोडणी मजूर म्हणून काम करत आहेत. त्यांच्यासोबत एकूण 32 जण असून ते सध्या कासेगाव येथे वास्तव्यास आहेत. काल 3 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास भुदरगड तालुक्यातील तिरवडेच्या दिशेने ट्रॅक्टरमधून ही सर्व मंडळी निघाली होती. रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे प्रचंड हादरे बसत होते. या हादरांमुळे किरण पालवी यांना पोटात दुखण्यास सुरुवात झाली. तसेच प्रस्तुतीच्या काळा येऊ लागल्या. दरम्यान, महिलेला त्रास होत असल्याचे बघून ट्रॅक्टर मालक सुरज नांदेकर यांनी 108 डायल करत रुग्णवाहिका बोलावली. मात्र, खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका येण्यास विलंब होत होता. त्यामुळे रुग्णवाहिका दाखल होण्यापूर्वीच रस्त्याच्या कडेला शेतामध्ये काही महिलांनी अडोसा निर्माण करत या महिलेची प्रसूती केली.
खुरप्याने कापावी लागली नाळ : किरण पालवी या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. दोघांचीही तब्येत ठीक आहे. जेंव्हा प्रसूती झाली तेंव्हा कोणतीही सुविधा नसल्याने टोळीतील लोकांना बाळाची नाळ खुरप्याने कापावी लागल्याची धक्कादायक बाब सुद्धा समोर आली आहे. हीच घटना समजताच यमगे गावातील आशा स्वयंसेविकांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत महिलेला, बाळाला येथील प्राथमिक उपचार केद्रात हलवले. तर डॉ. रुपाली लोकरे, आशासेविका सरिता एकल, सुनीता पाटील, सुनीता कांबळे यांनी धाव घेऊन उपचार केले. त्यांना रुग्णवाहिकेतून तात्काळ मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. सध्या त्यांच्यावर येथील मुरगुडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रस्त्यावरील खड्ड्यात पडून महापालिका अभियंत्यांच्या आईचा मृत्यू : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच कोल्हापूर महानगरपालिकेतील एका अभियंताच्या आईचा रस्त्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांच्या दुरुस्थितिचे तात्पुरते नाटक केले. मात्र, आजही अनेक रस्त्यांवर हजारो खड्डे पडले असल्याची सध्याची वस्तुस्थिती आहे. दरम्यान, ही गंभीर घटना ताजी असतानाच काल अशाच रस्त्यांच्या खड्ड्यामध्ये हादरे बसून एका गर्भवतीला अचानक प्रसूतीच्या कळा सुरू होऊन रस्त्यातच प्रसूती झाली आहे.
हेही वाचा - Sandeep Deshpande : स्टंपने हल्ला करणाऱ्यांचा कोच कोण याची आम्हाला माहिती आहे - संदीप देशपांडे