कोल्हापूर - राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा 15 जूनपासून ऑनलाईन सुरू करण्याबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या विचाराधीन आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्याचा भौगोलिक दृष्ट्या विचार केला, तर ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या निर्णयाला विरोध होताना पाहायला मिळत आहे. शिवाय विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांमध्येही याबाबत संभ्रमावस्था आहे. पाहूयात त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट...
गेल्या अडीच महिन्यांपासून संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट आहे. अजूनही नागरिकांमध्ये कोरोनाची भीती कायम आहे. देशभरासह राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा वाढत आहे. सध्या सरकारने काहीअंशी लॉकडाउन शिथिल केला आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय समोर आला. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी येत्या 15 जून पासून ऑनलाईन शिक्षण पद्धतीद्वारे शाळा सुरू करण्याचा विचार केला आहे. तशा सूचना सुद्धा संबंधितांना दिल्याचे समजते. मात्र ऑनलाईन शिक्षणाचा विचार झाल्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले असून त्यांचा विरोध पाहायला मिळत आहे.
पालक म्हणतात, मुलांच्या हातात मोबाईल दिला तर . . . .
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय योग्यही आहे. मात्र जो उद्देश घेऊन हा पर्याय समोर आला तो मात्र साध्य होणार नाही असे चित्र आहे. कारण जिल्ह्यात अनेक भागात अद्याप नेटवर्कच्या समस्या आहेत. तर काही पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल सुद्धा नाहीत. अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा प्रश्न कायम असणार आहे. शिवाय मुलांना मोबाईल देऊ नये, याबाबत नेहमी सांगितले जाते. दुसरीकडे त्यांच्याच हातात मोबाईल आले तर त्यांचे आरोग्य बिघडेल. शिवाय त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार असल्याचे पालकांनी म्हटले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण पद्धतीबाबत सोशल मीडिया आणि माध्यमांमधून समजले. मात्र त्यांना याबाबत कोणतेही प्रशिक्षण अध्याप देण्यात आलेले नाही. शिवाय ते ऑनलाईन शिक्षण पद्धतीबाबत संभ्रमावस्थेत आहेत. आम्हाला स्वतःला याबाबत माहिती नसेल तर आम्ही विद्यार्थ्यांना काय शिकवणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी सुद्धा अद्याप याबाबत कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे म्हटले आहे. जेव्हा आदेश येतील तेव्हा याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
'शिक्षणमंत्र्यांनी आधी त्यांच्या मतदारसंघात ऑनलाईन शिक्षणपद्धती राबवावी'
शिक्षणमंत्र्यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा निर्णय हा मुंबई, पुणे आणि मेट्रो सिटीवरून घेतला आहे, की काय असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. ऑनलाईन शिक्षण प्रणाली राबवण्याबाबतचा निर्णय घेताना त्यांनी ग्रामीण भागाचा विचार का केला नाही ? आधी त्यांनी त्यांच्या मतदारसंघात ऑनलाईन शिक्षणपद्धती राबवावी आणि त्यानंतर त्याचे मॉडेल म्हणून राज्यभर दाखवावे, असे कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
एकवेळ महिनाभर उशिरा शाळा सुरू करा, मात्र प्रत्यक्ष शाळेतच शिक्षण द्या असा पवित्रा विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतला आहे. त्यामुळे आता ऑनलाईन शिक्षण प्रणाली बाबत सर्वस्तरातून विरोध होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय घेण्यापूर्वी शिक्षणमंत्र्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्याही शिक्षणाचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे...