कोल्हापूर - थंडीच्या दिवसांत स्मशानभूमीत कार्यविधी करण्यासाठी आलेल्या लोकांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागते. त्यांना गरम पाणी उपलब्ध करण्यासाठी कोल्हापूरच्या एका गिरणी चालकाने स्मशानभूमीत सोलर पॅनल बसवले आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.
दोन दिवसांत सोलर पॅनल बसवले -
कार्यविधीसाठी स्मशानभूमीत आलेल्या लोकांना थंडीच्या दिवसांत थंड पाण्याची आंघोळ करावी लागते. या लोकांवर थंडीने कुडकूडण्याची वेळ येऊ नये, या उद्देशाने संभाजी जाधव या गिरणी चालकाने स्मशानभूमीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून, मला येथे सोलर बसवायचे आहे, असे सांगितले. अधिकाऱ्यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करत आयुक्तांकडे अर्ज करण्यास सांगितले. आयुक्तांनीदेखील त्यांचे कौतुक करत परवानगी दिली. त्यानंतर दोन दिवसात स्मशानभूमीत सोलर बसवण्यात आला. यासंदर्भात बोलताना माझ्या छोट्या कामामुळे अनेकजण पुढे येतील, अशी प्रतिक्रिया संभाजी जाधव यांनी दिली.