कोल्हापूर : प्रत्येकाच्या घरात काही मजेशीर गोष्टी होत असतात. त्याच गोष्टी सर्वांना व्हिडिओच्या माध्यमातून दाखविण्याचा ते प्रयत्न धनंजय पवार करत असतात. खरंतर कोरोनामुळे करायचे काय म्हणत सोशल मीडियावर घरातले व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली. अन् बघता बघता त्याला हजारो लोकं पाहू लागली आणि त्यांना ते आवडू सुद्धा लागले. त्यांच्याशीच आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला आहे पाहुयात...
कोरोना अन् व्हिडिओची सुरुवात : कोरोनामध्ये लॉकडाऊनमुळे सर्वजण घरीच होते. यावेळी पवार फॅमिलीचा फर्निचरचा मोठा व्यवसाय सुद्धा बंद ठेवावा लागल्याने सर्वजण घरातच अडकून होते. मुळातच धनंजय पवार अर्थात डीपी लहानपणापासून खट्याळ असल्याने त्यांनी कोरोनाकाळात घरातील मजेशीर गोष्टी, संवाद मोबाईलवर रेकॉर्ड करून पोस्ट करायला सुरुवात केली. त्याच्या आधी सुद्धा ते काही व्हिडिओ पोस्ट करायचे पण कोरोनामध्ये कामाच्या व्यापातून वेळ मिळल्याने त्यांनी यावर जोर दिला आणि बघता बघता अनेकांच्या मोबाईलपर्यंत ते अक्षरशः जाऊन पोहोचले. त्यांना यामध्ये सर्वात महत्वाची साथ दिली ती म्हणजे त्यांची पत्नी आणि आईंनी. आज अनेकांच्या आवडीचे हे कुटुंब बनले आहे शिवाय त्यांचे नवनवीन व्हिडिओ कधी येतात याची ते वाट सुद्धा पाहत असतात.
वडील सुद्धा अनेक व्हिडिओमध्ये : धनंजय पवार हे नाव जरी अनेकांना माहिती असले तरी त्यांचे व्हिडिओ अधिक मजेदार करायला त्यांच्या बायको आणि आईची नेहमीच साथ असते. घरातील सर्व कामे आवरून दोघीही व्हिडिओमध्ये हमखास दिसत असतात. विशेष म्हणजे वडील सुद्धा आता हळूहळू त्यांच्या अनेक व्हिडिओमध्ये दिसत असून संपूर्ण परिवारच यामध्ये आता दिसत आहे.
महिलांना संदेश : प्रत्येक घरात सासू सुनेची किरकोळ का होईना भांडण सुरू असतात. मात्र त्या भांडणानंतर एकमेकींना समजून घेणे महत्वाचे असल्याचे धनंजय पवार यांच्या आई अश्विनी पवार आणि पत्नी कल्याणी पोवार यांनी म्हंटले आहे. आम्ही घरामधले वातावरण नेहमीच आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. दोघींनी एकमेकांना सांभाळून घेऊन प्रत्येक सासूने सुनेला आपल्या मुलाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे. प्रत्येक सुनेने सुद्धा सासुमध्ये आईला पाहिले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. भांडणे प्रत्येकाच्या घरात होत असतात मात्र, ज्याची चूक आहे त्याने लगेचच ती सुधारली पाहिजे आणि घरातील वातावरण पुन्हा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असेही त्या दोघींनी म्हटले आहे.
सुरुवातीला वडिलांचा विरोध : दरम्यान, आता जरी धनंजय पवार यांच्या अनेक व्हिडिओमध्ये त्यांचे वडील दिसत असले तरी त्यांच्या वडिलांचा सर्वात पहिला हे व्हिडिओ करण्यासाठी विरोध होता. सुरुवातीला अनेकवेळा वडिल अजित पवार यांनी धनंजय पवार यांना घरातून बाहेर सुद्धा जा बोलले होते. असे व्हिडिओ आपल्याला या घरात चालणार नाहीत बोलले होते. व्हिडिओमधून चुकून कोणाच्या भावना दुखवू शकतात त्याची काळजी घ्यावी लागते आणि असे व्हिडिओ नको असे त्यांचे म्हणणे असायचे. मात्र हळूहळू त्यांच्या व्हिडिओला मिळत चाललेला प्रतिसाद पाहून अनेकजण धनंजय पवार यांच्या वडिलांना सुद्धा भेटल्यावर बोलू लागले. आम्ही तुमच्या मुलाचे आणि घरातील मजेशीर व्हिडिओ आवडीने पाहतो. तेव्हापासून त्यांची सुद्धा या व्हिडिओसाठी साथ मिळत गेली आणि आता आनंदाने ते सुद्धा प्रत्येक व्हिडिओमध्ये एखाद्या पाहुण्या कलाकारासारखी एखादी भूमिका पार पाडत असतात.