कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त उद्या स्मृती जागर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेला कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य कन्हैया कुमारसुद्धा उपस्थित राहणार आहे. परंतु, या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत ही सभा होणारच असल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या गिरीश फोंडे यांनी दिली.
सहाव्या स्मृतीदिनानिमित्त 'स्मृती जागर' सभा -
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त उद्या शनिवार 20 फेब्रुवारी रोजी कन्हैया कुमारची जाहीर सभा होणार आहे. येथील ऐतिहासिक दसरा चौकामध्ये सायंकाळी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेला काही तासच उरले असताना पोलिसांनी खुल्या मैदानातील सभेला परवानगी नाकारली असून बंदिस्त ठिकाणी ही सभा घेण्यात यावी असे म्हटले आहे. त्यामुळे आयोजकांनी नाराजी व्यक्त केली असून कोणत्याही परिस्थितीत दसरा चौकात ही सभा पार पडणार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे या सभेला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील काही आमदारांचीदेखील उपस्थिती असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या सभेला परवानगी दिली होती. मात्र, पोलिसांनी आता सभेला परवानगी नाकारली असल्याने आयोजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.