कोल्हापूर - जिल्ह्यातील नागरिकांची चिंता आता पुन्हा एकदा वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत होते. आज सकाळी 10 पर्यंत 16 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.
आज सकाळी मिळालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून आज सकाळी 10 पर्यंत आणखी 16 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. केवळ एका रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. रात्रीपासून एकूण 273 जणांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले आहेत त्यातील 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 5 जणांचे अहवाल प्रलंबित असून इतर सर्व अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 797 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 713 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोल्हापूरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 74 झाली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 36 पर्यंत पोहोचली होती. मात्र त्यामध्ये झपाट्याने वाढ होऊन अॅक्टिव्ह रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे.
आज सापडलेले 16 रुग्ण पुढीलप्रमाणे :
गडहिंग्लज तालुक्यातील- 3
हातकणंगले तालुक्यातील- 1
करवीर तालुक्यातील- 2
पन्हाळा तालुक्यातील -1
इचलकरंजी शहरातील- 8
कोल्हापूर शहरातील -1
विशेष म्हणजे इचलकरंजी शहरात एकाच दिवशी 8 रुग्णांची वाढ झाली आहे. कुडचे मळा या एकाच परिसरातील मोठ्या संख्येने रुग्ण असल्याने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हा परिसर हॉटस्पॉट म्हणून घोषित केला आहे.